‎BHANDARA NEWS | अड्याळ निवडणुकीत ‎उपसरपंचांकडून सरपंचांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ! - टॉप न्यूज मराठी

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक आता आरोप-प्रत्यारोपांनी चांगलीच गाजू लागली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापले असून, उपसरपंचांनी थेट सरपंचांवर १ कोटींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. सरपंचांना केवळ ठेकेदारीत रस असून त्यांनी विकासाकडे पाठ फिरवल्याचा दावा उपसरपंच शंकर मानापुरे यांनी केला आहे. ‎भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळमध्ये सध्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. मात्र, ही निवडणूक आता केवळ सत्तेसाठी राहिली नसून ती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पेटली आहे. उपसरपंच शंकर मानापुरे यांनी विद्यमान सरपंचांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.मानापुरे यांच्या मते, अड्याळला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असताना, केवळ स्वतःचा आर्थिक फायदा आणि ठेकेदारी बंद होईल या भीतीने सरपंचांनी याला विरोध दर्शवला. इतकेच नव्हे तर, राजकीय सूडबुद्धीतून चार सदस्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.या वादात आता महिला सन्मानाचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. सदस्य अपात्र झाल्यावर सरपंचांनी जल्लोष केला आणि महिला सदस्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करत मानापुरे यांनी सरपंचांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.