Beed : गेवराई शहरातील पवार गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद होऊन धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फटाक्याच्या ठिणगीवरून सुरू झालेला वाद काही वेळातच तुफान हाणामारीत बदलला. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खडके हे पत्नी व मुलीसह रिक्षाने घरी जात असताना पवार गल्ली परिसरातील मशीद परिसरात काही तरुण फटाके फोडत होते. यावेळी फटाक्याची ठिणगी खडके यांच्या मुलीच्या अंगावर पडल्याने दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी धारदार शस्त्राने हात, मान व पाठीवर वार करण्यात आले. तसेच एका महिलेलाही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेत सार्थक सुनील खडके वय 21, मनीषा सुनील खडके वय 42, ओम गणेश खडके वय 19, सुनील सुधाकर खडके वय 50 रा. पवार गल्ली, गेवराई आणि मंगेश शिवाजी गोरे वय 19 हे पाच जण जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना सुरुवातीला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. मंगेश शिवाजी गोरे यांच्या मानेवर व छातीजवळ धारदार शस्त्राने वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धराज सुकाळे, जमादार सोनवणे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सोमनाथ मोटे सह शाम जाधव, बीड / गेवराई