Beed : बीडमध्ये दारूबंदी विभागाच्या कार्यालयाच्या पार्किंगला भीषण आग, 5 चारचाकींसह अनेक दुचाकी जळून खाक - टॉप न्यूज मराठी

Beed : बीड शहरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली आहे. दारूबंदी विभागाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल पाच चारचाकींसह अनेक दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आगीची तीव्रता इतकी मोठी होती की पार्किंगमध्ये ठेवलेले रेकॉर्ड आणि इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कार्यालयाच्या भिंतीलाही आगीच्या झळा बसून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कार्यालयाच्या आतील साहित्य सुरक्षित राहिले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. गेवराई, धोंडराई, देवपिंप्री पाठोपाठ आता बीड शहरात आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीच्या कारणांचा शोध आणि नुकसानीचा पंचनामा याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 प्रतिनिधी : सोमनाथ मोटे सह शाम जाधव, बीड - टॉप न्यूज मराठी