गेवराई : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम आणि आपुलकीचा उत्सव! मात्र, याच सणाला माणुसकीची अनोखी किनार लाभली, ती बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या बालग्राम भेटीमुळे. भाऊबीजेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपली कन्या हेलेना हिला सोबत घेत गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील बालग्राम प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अनाथ, निराधार आणि वंचित मुलांसोबत भाऊबीजेचा आनंद साजरा करत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुलांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेत दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली.
जिल्हाधिकारी आपल्या कन्येसह थेट मुलांमध्ये मिसळल्याने बालग्राममधील वातावरण आनंदाने फुलून गेले. पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता मुलांशी आपुलकीने संवाद साधणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीने उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, आपल्या मुलीलाही या सामाजिक उपक्रमात सहभागी करून त्यांनी प्रेम, समानता आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला.
बालग्रामच्या कार्याचा घेतला आढावा
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी बालग्राम आणि युवा ग्राम येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी केली. संस्थेचे संस्थापक यांनी मुलांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्थेच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.
शिशुगृह, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, भोजनकक्ष, कलादालन आणि सांस्कृतिक सभागृह अशा विविध सुविधांची पाहणी करून त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती घेतली.
पाणी बचतीचा उपक्रम ठरला विशेष आकर्षण
बालग्राममध्ये राबविण्यात येणारा पाणी बचतीचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरला. प्रत्येक मुलाला झाड देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच अंघोळीनंतर आणि कपडे धुतल्यानंतर वापरलेले पाणी संबंधित झाडांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर होत असून लहान वयातच मुलांमध्ये वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पाणी बचतीची जाणीव रुजवली जात आहे. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
मुलांसोबत भोजन; संस्थांकार्याचे कौतुक
बालग्राममधील मुलांसोबत स्नेहभोजन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि पोषणमूल्यांबाबत समाधान व्यक्त केले. मुलांना मिळणारे प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक वातावरण पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
अनाथ आणि वंचित मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी संस्थाचे हे करत असलेले कार्य अत्यंत मोलाचे असून अशा सामाजिक कार्याचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
'अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा'; विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुलांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, आत्मविश्वास, जिद्द आणि ध्येय निश्चिती यावर मार्गदर्शन केले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाच्या जोरावर आयुष्यात मोठे यश संपादन करता येते, असा विश्वास त्यांनी मुलांमध्ये निर्माण केला.
स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि प्रशासकीय सेवेत येण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. भविष्यात बालग्राममधील मुलांनी विविध क्षेत्रांत मोठे यश मिळवून अधिकारी व्हावे आणि समाजासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ठरला भेटीचा खरा आनंद!
जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कन्या हेलेना यांनी मुलांसोबत घालवलेला वेळ बालग्राममधील मुलांसाठी यंदाच्या दिवाळीतील अविस्मरणीय ठेवा ठरला. दिवाळी फराळ, भेटवस्तू, गप्पा आणि स्नेहभोजनाच्या माध्यमातून मुलांना केवळ भेटवस्तूच मिळाल्या नाहीत, तर आपुलकीच्या नात्याचा अनुभवही मिळाला.
या भेटीबद्दल संस्थेने यांनी समाधान व्यक्त करत, प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजातील वंचित घटकांशी भावनिक नाते जोडणारा हा उपक्रम मुलांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करणारा असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नायब तहसीलदार संजय सोनवणे, बालग्रामचे संस्थापक , महसूल मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, ग्राम महसूल अधिकारी लहू सोन्नर, योगेश कापसे, संदीपान राऊत तसेच बालग्रामचा संपूर्ण कर्मचारीवृंद उपस्थित होता.
भाऊबीजेच्या निमित्ताने झालेली ही भेट केवळ एका सणाचा उत्सव नव्हती, तर अनाथ आणि वंचित मुलांच्या आयुष्यात प्रेमाचे चार क्षण फुलवणारा माणुसकीचा सोहळा होता. पदापेक्षा माणुसकी मोठी आणि भेटवस्तूंपेक्षा आपुलकी अनमोल असते, याची प्रचिती या भेटीतून आली.
सोमनाथ मोटे सह शाम जाधव बीड गेवराई टाॅप न्यूज मराठी