आष्टी : आष्टी तालुक्यातील देवळाली परिसरात शनिवारी सकाळी वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी देविदास महादेव टकले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास टकले हे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लोखंडवाडी-सोनेपठार शिवारात गेले होते. दुष्काळामुळे जनावरांसाठी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ते चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी शेतात गेले असताना वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी टकले घरी परतले नाहीत, म्हणून त्यांच्या मुलाने आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला. शोध घेत असताना वाघ मृतदेहाजवळच बसलेला दिसून आला. हे दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली.
देवळाली, बावी आणि धामणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्याचा वावर वाढला आहे. शेतात जाणे, जनावरे चारायला नेणे, रात्री बाहेर पडणे हे नागरिकांसाठी धोक्याचे झाले आहे. गेल्या तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात चार शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मोहन आमटे यांनी या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
वनविभागाने तातडीने कारवाई केली नाही, तर कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे चाऱ्याची टंचाई आणि आता वन्यप्राण्यांचा धोका, यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा सवाल परिसरातील शेतकरी विचारत आहेत.
या घटनेमुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून वनविभाग नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी : सोमनाथ मोटे, बीड