BEED : "बीड जिल्हा रुग्णालयाची हलगर्जी ! सिझेरियनमध्ये पोटातच राहिले हातमोजे आणि कागद, नवमाता ससूनमध्ये मृत्यूशी झुंज देतेय" - टॉप न्यूज मराठी

बीड : वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका 19 वर्षीय नवमातेच्या जीवावर बेतले आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद तसेच सोडून दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सध्या ही तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

काय घडले नेमके ?

बीड तालुक्यातील संध्या सूरज गायकवाड या तरुणीची 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिझेरियनद्वारे प्रसूती झाली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 4 दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले. पण घरी गेल्यानंतर संध्याच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली. कुटुंबीयांनी तातडीने तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे केलेल्या सोनोग्राफी आणि इतर तपासण्यांमध्ये पोटात काहीतरी बाहेरची वस्तू असल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

ससून रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी संध्याच्या पोटाची तपासणी केली. यावेळी तिच्या पोटातून सर्जिकल ग्लोव्हज आणि कागदाचे तुकडे बाहेर काढण्यात आले, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संध्याचे पती सूरज गायकवाड यांनी बीडच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही वेळ आल्याचा आरोप केला आहे. तर संध्याच्या आईने "मुलीने बाळाला जन्म दिला, पण आता त्या बाळाला जवळ घेण्याचीही तिच्यात ताकद नाही" असे म्हणत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

ही घटना उघड होताच बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सिझेरियन करणाऱ्या महिला डॉक्टरांसह शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळणारी ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. सध्या संध्या गायकवाड यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.