Bank Strike : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग ३ दिवस बँका बंद राहणार; 'ही' कामं आधीच उरकून घ्या - टॉप न्यूज मराठी

बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चालू महिन्याच्या शेवटी सलग ३ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे देशभरातील बँक शाखांमधील सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे महत्त्वाचे बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपाची हाक दिली आहे. या संपामुळे या तीन दिवसांत बँक शाखांमधील रोख रकमेचे व्यवहार, धनादेश वटवणे (Cheque Clearance) आणि इतर महत्त्वाच्या सेवा पूर्णपणे ठप्प किंवा प्रभावित होऊ शकतात.

बँक शाखा बंद असल्या तरी ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील. UPI पेमेंट, नेट बँकिंग (Net Banking) आणि मोबाईल बँकिंग (Mobile Banking) सेवा २४ तास सुरू राहतील.

त्यामुळे ग्राहकांनी पैशांच्या देवाणघेवाणीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा. संपकाळात काही एटीएममधील (ATM) रोख रक्कम संपण्याची शक्यता असल्याने गरजेपुरते पैसे आधीच काढून ठेवणे सोयीचे ठरेल.