"Ate o fim do mundo" ! पोर्तुगालमध्ये राजाने राणीच्या मृतदेहाशी केले लग्न, हाडांच्या सांगाड्याला बसवले सिंहासनावर ! अद्भुत प्रेमकथा - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : प्रेमासाठी माणूस काय काय करेल याची काही मर्यादा नसते. पण 14 व्या शतकात पोर्तुगालच्या एका राजाने प्रेमासाठी जे केले ते ऐकून आजही जग थक्क होते. त्याने आपल्या प्रेयसीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाला थडग्यातून बाहेर काढले, तिला लग्नाचा पोशाख घातला, राणी म्हणून सिंहासनावर बसवले आणि सर्व मंत्र्यांना तिच्या हाडाच्या हाताचे चुंबन घ्यायला लावले. ही आहे पोर्तुगालचा राजा पेड्रो पहिला आणि इनेस डी कॅस्ट्रो यांची जगातील सर्वात भयानक आणि खऱ्या प्रेमाची कहाणी.

कोण होती इनेस

गोष्ट आहे 1340 सालची. पोर्तुगालचा युवराज पेड्रो याचे लग्न स्पेनच्या राजकन्या कॉन्स्टांझाशी झाले होते. हे एक राजकीय लग्न होते. कॉन्स्टांझा सोबत तिची एक दासी म्हणून इनेस डी कॅस्ट्रो पोर्तुगालमध्ये आली. इनेस अतिशय सुंदर होती. तिला पाहताच पेड्रो तिच्या प्रेमात पडला.

पेड्रो आणि इनेसचे प्रेम इतके वाढले की दरबारात त्याची चर्चा होऊ लागली. पण राजकन्या कॉन्स्टांझा जिवंत असल्याने दोघे उघडपणे एकत्र येऊ शकत नव्हते. काही वर्षांनी कॉन्स्टांझाचा मृत्यू झाला. आता पेड्रो आणि इनेस मोकळेपणाने राहू लागले. त्यांना चार मुलेही झाली.

पण पोर्तुगालच्या राजाला हे मान्य नव्हते. राजा अफोन्सो चौथा याला भीती वाटली की इनेस ही स्पेनची आहे, तिची मुले गादीवर हक्क सांगतील आणि पोर्तुगाल स्पेनच्या ताब्यात जाईल. म्हणून राजाने एक क्रूर निर्णय घेतला.

राणीचा निर्घृण खून

7 जानेवारी 1355 रोजी जेव्हा पेड्रो शिकारीला गेला होता, तेव्हा राजा अफोन्सोने तीन मारेकऱ्यांना पाठवले. इनेस आपल्या मुलांसोबत महालात होती. त्या मारेकऱ्यांनी तिचा मुलांसमोरच गळा चिरून खून केला. तेव्हा इनेस फक्त 30 वर्षांची होती.

ही बातमी ऐकताच पेड्रो वेडा झाला. त्याने आपल्या वडिलांविरुद्धच बंड पुकारले आणि देशात युद्ध सुरू झाले. दोन वर्षे बाप लेकामध्ये युद्ध चालले. 1357 मध्ये राजा अफोन्सोचा मृत्यू झाला आणि पेड्रो पोर्तुगालचा राजा बनला.

राजाचा भयंकर सूड

राजा बनताच पेड्रोने पहिले काम केले ते म्हणजे इनेसला मारणाऱ्या त्या तीन मारेकऱ्यांना शोधणे. त्यातील दोघांना पकडण्यात आले. पेड्रोने भर दरबारात त्यांची छाती फाडून त्यांचे हृदय बाहेर काढले. तो ओरडला की ज्या हृदयाने माझ्या इनेसला मारण्याचा विचार केला ते हृदय मला पाहिजे.

आता खरी भयानक घटना घडली.

1360 साली राजा पेड्रोने आदेश दिला की इनेसचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढा. 5 वर्षे जमिनीत गाडलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. फक्त सांगाडा उरला होता. त्या सांगाड्याला राणीचे कपडे घातले गेले, डोक्यावर मुकुट ठेवला गेला आणि पोर्तुगालच्या सिंहासनावर बसवण्यात आले.

पेड्रोने जाहीर केले की मी इनेसशी गुपचूप लग्न केले होते, त्यामुळे तीच या देशाची खरी राणी आहे. सर्व दरबारी, मंत्री आणि सरदारांनी एका रांगेत येऊन त्या मृतदेहाच्या हाताचे चुंबन घेऊन तिला राणी म्हणून स्वीकारावे आणि निष्ठेची शपथ घ्यावी. मृत्यूच्या भीतीने सर्वांनी त्या सांगाड्याच्या हाताचे चुंबन घेतले.

यानंतर पेड्रोने अल्कोबाका मठात दोन सुंदर थडगी बांधली. एक स्वतःसाठी आणि एक इनेससाठी. दोन्ही थडगी अशी बनवली की ती एकमेकांसमोर असतील, जेणेकरून कयामतच्या दिवशी जेव्हा दोघे उठतील तेव्हा सर्वात आधी एकमेकांना पाहू शकतील.

आजही त्या दोघांची थडगी पोर्तुगालमध्ये आहेत. त्यावर लिहिले आहे "Ate o fim do mundo" म्हणजे जगाच्या अंतापर्यंत.