Apple CEO Tim Cook Steps Down : अ‍ॅपलमध्ये आजपासून नव्या युगाची सुरुवात! टिम कूक यांच्यानंतर 'हा' इंजिनिअर सांभाळणार कंपनीची धुरा ... - टॉप न्यूज मराठी

जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी अ‍ॅपल (Apple) मध्ये तब्बल १५ वर्षांनंतर ऐतिहासिक नेतृत्व बदल झाला आहे. कंपनीचे यशस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कूक (Tim Cook) १ सप्टेंबर २०२६ पासून आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी अ‍ॅपलचे अनुभवी हार्डवेअर प्रमुख जॉन टर्नस (John Ternus) यांनी कंपनीचे ८ वे सीईओ म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.  

पद सोडण्यापूर्वी टिम कूक यांनी 'X' (ट्विटर) वर अ‍ॅपल युजर्ससाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, "सीईओ म्हणून माझा आज शेवटचा दिवस असून मी अ‍ॅपल समुदायाला खूप प्रेम देतो. उद्या माझे पद बदलेल, परंतु अ‍ॅपल समुदायासाठी असलेले माझे प्रेम कधीही बदलणार नाही." टिम कूक आता कंपनीत एक्झिक्युटिव्ह चेअरमन (Executive Chairman) ही नवीन जबाबदारी सांभाळणार आहेत. 

टिम कूक यांचा ४ ट्रिलियन डॉलरचा ऐतिहासिक प्रवास

स्टीव्ह जॉब्स यांच्यानंतर ऑगस्ट २०११ मध्ये टिम कूक यांनी अ‍ॅपलच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात अ‍ॅपलचे बाजार मूल्य ३५० अब्ज डॉलरवरून तब्बल ४.७ ट्रिलियन डॉलरच्या (सुमारे ४०० लाख कोटी रुपये) अभूतपूर्व टप्प्यावर पोहोचले. सीईओ असताना कूक यांचे वार्षिक मानधन आणि स्टॉक्स मिळून कमाई सुमारे ६० दशलक्ष ते १०० दशलक्ष च्या घरात होती. त्यांची एकूण संपत्ती $२ अब्ज (सुमारे १६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे. आता एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनल्यावर त्यांचा मूळ पगार ३ दशलक्षवरून २ दशलक्ष करण्यात आला आहे. 

नवे सीईओ जॉन टर्नस कोण आहेत? (Who is John Ternus)

५१ वर्षीय जॉन टर्नस हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असून ते गेल्या २५ वर्षांपासून अ‍ॅपलमध्ये कार्यरत आहेत. सीईओ बनण्यापूर्वी ते अ‍ॅपलचे 'सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ हार्डवेअर इंजिनिअरिंग' म्हणून काम पाहत होते. आयफोन (iPhone), आयपॅड (iPad), मॅक (Mac) आणि एअरपॉड्स (AirPods) या अ‍ॅपलच्या सर्वात यशस्वी उत्पादनांच्या डिझाइनिंग आणि विकासाचे मुख्य श्रेय टर्नस यांना जाते. मॅक कॉम्प्युटर्सना इंटेल प्रोसेसरवरून अ‍ॅपलच्या स्वतःच्या 'एम-सिरीज' (M-Series Chips) वर शिफ्ट करण्याच्या ऐतिहासिक निर्णयात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 

जॉन टर्नस यांच्यासमोरील नवीन आव्हाने

अ‍ॅपलच्या बोर्डाने जॉन टर्नस यांच्यासाठी वार्षिक $५५ दशलक्षचा (सुमारे ४६० कोटी रुपये) इक्विटी अवॉर्ड मंजूर केला आहे. मात्र, पदभार स्वीकारताच त्यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत. गुगल आणि सॅमसंगच्या तुलनेत अ‍ॅपलला 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (Apple Intelligence) क्षेत्रात आघाडीवर नेणे. येत्या ९ सप्टेंबर रोजी होणारा अ‍ॅपलचा मोठा लॉन्च इव्हेंट हा सीईओ म्हणून त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम असेल, ज्यामध्ये नवीन आयफोन आणि एआय फीचर्स सादर केले जातील.