Anushka Sarkate Nikhil Chavan Wedding : 'कारभारी लयभारी' (Karbhari Laybhari) या लोकप्रिय मालिकेतील लाडकी जोडी आता खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांचा शाही विवाह सोहळा नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे हा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्याचे काही खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, या लग्नाला जवळचे पाहुणे मित्र आणि कलाकार मंडळी उपस्थित होते.. निखिल आणि अनुष्का यांनी लग्नासाठी पारंपारिक लुक केला होता. सध्या चाहते तसेच कलाकार या दोघांवरती शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत..
सोशल मीडियावर या जोडप्याच्या मंडपात प्रवेश करतानाचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोय. यामध्ये अनुष्का डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन आणि निखिल हातात भगवा ध्वज घेऊन लग्नाच्या मंडपात प्रवेश करताना दिसले. अनुष्काने लग्नासाठी सुंदर हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, तर निखिलने त्याला साजेसा पारंपरिक धोतर-कुर्ता घातला होता. या सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेषतः निखिलच्या 'लागिरं झालं जी' मालिकेतील कलाकार आणि अभिनेत्री शिवानी बावकर या लग्नात उत्साहाने सहभागी झाले होते. लग्नाआधी मेहंदी, हळद आणि संगीत सोहळा पार पडला. तसेच ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या घरी या दोघांचे 'केळवण'ही झाले होते. 'रीला' मधील राजा-राणी आता 'रिअल' लाईफमध्ये एकत्र आल्यामुळे त्यांचे चाहते आणि सहकलाकार सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
‘एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच त्यांची ही रंजक कहाणी आहे. अनुष्का आणि निखिल यांची पहिली भेट २०२० मध्ये 'कारभारी लयभारी' (Karbhari Laybhari) या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेत त्यांनी मुख्य नायक-नायिका (ऑनस्क्रीन जोडपे) म्हणून काम केले. जवळपास वर्षभर एकत्र काम करताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यातील संवाद अधिक वाढला आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यांनी तब्बल ५ वर्षे आपले हे नाते मीडिया आणि चाहत्यांपासून पूर्णपणे लपवून ठेवले होते. लग्न ठरल्यानंतरच त्यांनी हे नाते सर्वांसमोर जाहीर केले.
अनुष्काने एका शोमध्ये सांगितले होते की, "माझे वडील ज्या मुलावर हात ठेवतील (पसंती देतील), त्याच्याशीच मी लग्न करेन." हे ऐकल्यानंतर निखिलने अनुष्कापेक्षा जास्त तिच्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली, जेणेकरून तो त्यांची पसंती मिळवू शकेल. निखिलने यावर मजेशीरपणे सांगितले की, "माझ्यावर फक्त वडिलांनीच नाही, तर पूर्ण सरकटे कुटुंबाने विश्वास ठेवून हात ठेवला आहे."
संगीत सोहळ्यात अनुष्काने यावर एक सुंदर उखाणा घेतला: "निखिलला मी म्हटलं, माझे वडील ज्या मुलावर हात ठेवणार त्याच्याशीच मी लग्न करणार... मैत्रीतून प्रेम, प्रेमातून लग्न... उद्या घेऊन येतोय वरात दारी, आता जन्मभर मी म्हणणार... आमचे कारभारी जगात लयभारी!"
निखिलनेही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्कील टिप्पणी करत संगीत सोहळ्यात खास उखाणा घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. “अलिकडच्या काळात फुटतायत आमदार, खासदार; मी जरी असलो रुबाबदार , तरी माझ्या आनंदासाठी अनुष्काच जबाबदार', असा हा भन्नाट उखाणा निखिलनं घेतला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत आणि हसत हसत दाद दिली.
निखिलची मानलेली बहीण आणि मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिवानी बावकर लग्नाच्या दोन दिवस आधीच छत्रपती संभाजीनगरला पोहोचली होती. तिने बहिणीची सर्व कर्तव्ये पार पाडत लग्नात उत्साहाने सहभाग घेतला. लग्नविधी दरम्यान निखिल आणि शिवानी यांच्यातील बहीण-भावाचे नाते आणि त्यांचे काही भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, ज्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. मालिकेतील खलनायक 'भैय्यासाहेब' म्हणजेच किरण गायकवाड आणि या मालिकेची निर्माती व अभिनेत्री श्वेता शिंदे यांनीही उपस्थित राहून नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. संगीत सोहळ्यात शिवानी बावकर, किरण गायकवाड आणि इतर कलाकारांनी एकत्र येत स्टेजवर जबऱ्या डान्स केला. बऱ्याच वर्षांनंतर 'लागिरं झालं जी'ची संपूर्ण स्टारकास्ट एकाच छताखाली एकत्र आल्यामुळे चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.