अमरावती : सांगली, सातारा, बीड आणि ठाणे-मुंबई येथील न्यायालयांच्या अधिकृत संकेतस्थळांवर धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली. न्यायालयाच्या दोन्ही इमारतींमधील वकील, कर्मचारी आणि नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण न्यायालय परिसराला पोलिसांनी वेढा घातल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, यशवंत सोलंके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच QRT घटनास्थळी दाखल झाली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. न्यायालयाच्या इमारतींच्या आतही पोलिसांनी तपासणी व सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. दरम्यान, अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी दाखल झाले.
अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे न्यायालयात उपस्थित असलेल्या वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच संपूर्ण न्यायालय परिसर पोलिसांच्या नियंत्रणाखाली आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ही कारवाई पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट केले. मात्र, राज्यातील विविध न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती न्यायालयातही सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, न्यायालयाच्या दोन्ही इमारती अचानक रिकाम्या करणे, QRT पथकासह शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करणे आणि अग्निशमन दलाला पाचारण करणे, यामुळे या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या पत्रकार परिषदेनंतर या संपूर्ण घडामोडींचे स्वरूप, मॉक ड्रिलचा उद्देश आणि न्यायालयांना मिळालेल्या धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी : राज माहोरे, अमरावती