मनोरंजन : अमिताभ बच्चन यांनी रिटायरमेंट घेणार असल्याच्या चर्चांवर स्वतःच पूर्णविराम दिला आहे. मी कामातून रिटायर होत नाहीये, असे बिग बींनी आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट सांगितले आहे. जी नहीं हुजूर, मैं काम से रिटायर नहीं हो रहा हूं, असे म्हणत त्यांनी सर्व अफवांचे खंडन केले आहे. त्यांच्या एका वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता.
अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध कवी होते आणि आई तेजी बच्चन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचे शालेय शिक्षण अलाहाबाद येथील बॉईज हायस्कूलमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील किरोरीमल कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी घेतली. 1973 मध्ये त्यांनी अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी लग्न केले. त्यांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुले आहेत. अमिताभ यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्थानी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर आनंद, जंजीर, दीवार, शोले, डॉन, अग्निपथ, ब्लॅक, पीकू सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. 2000 पासून ते कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. त्यांना आतापर्यंत 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नेमके काय घडले होते तर काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये KBC 18 च्या शूटिंगचा अनुभव शेअर केला होता. KBC मध्ये येणारे स्पर्धक अनेकदा खूप भावनिक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या घेऊन येतात, त्यामुळे शो होस्ट करणे कठीण जाते, असे त्यांनी लिहिले होते. आणि त्या ब्लॉगच्या शेवटी त्यांनी इट्स लेट, टाइम टू रिटायर आणि आय विश टू रिटायर नाऊ असे लिहिले होते. त्यांच्या या दोन वाक्यांवरून मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की बिग बी अभिनयातून आणि KBC मधून निवृत्त होत आहेत. यावर आता अमिताभ यांनीच आपल्या नव्या ब्लॉगमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एका वृत्तपत्राचे कटींग शेअर केले ज्यात त्यांच्या रिटायरमेंटची बातमी छापली होती. त्यानंतर त्यांनी लिहिले की मी माझ्या ब्लॉगमध्ये इट्स लेट, टाइम टू रिटायर असे लिहिले होते, याचा अर्थ कामातून रिटायर होणे नव्हता, तर रात्री खूप उशीर झाला आहे, आता लिखाण थांबवून झोपायला गेले पाहिजे असा होता. लोकांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. मी झोपायला जात होतो, कामातून रिटायर होत नव्हतो. यावेळी त्यांनी मजेशीर अंदाजात मीडियाला टोमणाही मारला.
सध्या अमिताभ बच्चन वयाच्या 82 व्या वर्षीही प्रचंड व्यस्त आहेत. ते सध्या सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती 18 हा शो होस्ट करत आहेत. या शोचे शूटिंग ते रोज करत आहेत. यासोबतच त्यांच्याकडे अनेक जाहिराती आणि दोन मोठ्या चित्रपटांचे शूटिंग आहे. वयाच्या 80 नंतरही ते रोज रात्री आपला ब्लॉग लिहितात आणि सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी स्पष्ट केले आहे की अभिनयातून निवृत्तीचा त्यांचा कोणताही विचार नाही आणि जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत ते काम करत राहणार आहेत.