मनोरंजना विश्व : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियापासून दूर राहणार आहेत. स्वतः अमिताभ यांनी याबाबत माहिती दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी नमूद केले होते की, वैद्यकीय सल्ल्यानुसार मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. त्यामुळे काही काळ मी ऑनलाईन येणार नाही.
83 वर्षीय बिग बी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज रात्री ब्लॉग लिहिणे, चाहत्यांशी संवाद साधणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे अचानक त्यांनी ब्रेक घेतल्याची घोषणा केल्यावर चाहते चिंतेत पडले. सोशल मीडियावर बिग बींना काय झाले, तब्येत ठीक आहे का, असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागले.
चाहत्यांची ही चिंता पाहून अमिताभ यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्ध टंबलर ब्लॉगच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले. त्यांनी लिहिले, शरीराला समजून घेणे खूप कठीण आहे. शरीर अजूनही विश्रांती मागत आहे. मी स्वतःला वेळ देत आहे. यावरून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून फक्त थकवा आणि विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट होते.
यावेळी त्यांनी चाहत्यांची माफी मागून म्हटले होते की, माझ्याकडून रोजची पोस्ट होणार नाही, याबद्दल क्षमस्व, माझी परिस्थिती समजून घ्याल अशी आशा आहे.
तब्येत बिघडण्यामागचे कारण काय? गेल्या काही दिवसांपूर्वी केबीसी 18 च्या मंचावर त्यांचा पाय घसरला होता. त्यात त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांनी शोमध्ये सांगितले होते की, उभे राहताना वेदना होत आहेत. सध्याची विश्रांती त्याच दुखापतीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सध्या अमिताभ बच्चन मुंबईतील जलसा या आपल्या बंगल्यावर आराम करत आहेत आणि लवकरच ते पुन्हा कामावर परततील अशी चाहत्यांना अशा आहे.