मुंबई : अभिनेता आमिर खान Actor Amir Khan अखेर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. 5 जुलै रोजी त्याने मुंबईतील बांद्रा येथील आपल्या निवासस्थानी प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत नोंदणीकृत विवाह केला. या खास सोहळ्याला दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील त्याचे जवळचे मित्र, कुटुंबीय आणि मुलं उपस्थित होती. या खास दिवसाची आठवण कायमस्वरूपी राहावी यासाठी आमिर खानने कोणतीही कसर सोडली नाही. लग्नाच्या निमित्ताने त्याने गौरी स्प्रॅटला एक खास अंगठी भेट दिली. मात्र, ही अंगठी तयार करण्यापूर्वी तिच्यासाठी योग्य स्टोन शोधण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला.अशी माहिती मिळते आहे.
आमिरने गौरीला भेट दिलेली ही अंगठी लक्झरी ज्वेलरी ब्रँड 'क्वीन'ने तयार केली आहे. या अंगठीच्या मध्यभागी मेडागास्करमधून आणलेला दुर्मिळ कॅबोशॉन-कट नैसर्गिक रुबी स्टोन जडवण्यात आला आहे. या रुबीभोवती सोन्याच्या मुकुटासारखी नक्षी करण्यात आली असून त्यावर 40 अस्सल हिऱ्यांची आकर्षक जडणघडण करण्यात आली आहे. हा रुबी स्टोन केवळ दुर्मिळच नाही, तर त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत घासून-पॉलिश करण्यासाठी सुमारे 256 तास लागले. ही अंगठी तयार करण्यासाठी जवळपास 131 कारागिरांनी मेहनत घेतली. विशेष म्हणजे, हा दुर्मिळ रुबी स्टोन शोधण्यासाठीच तब्बल तीन महिने लागले.
आमिर आणि गौरीची पहिली भेट कशी झाली?
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या वयात 13 वर्षांचे अंतर आहे. दोघांची पहिली भेट तब्बल 25 वर्षांपूर्वी बेंगळुरूमध्ये झाली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्यात प्रेमसंबंध नव्हते. त्या काळात आमिर बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीत व्यस्त होता, तर गौरी फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफी क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत होती. जवळपास दोन दशकं एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर 2024 मध्ये कौटुंबिक ओळखीच्या माध्यमातून दोघांची पुन्हा भेट झाली. एका मुलाखतीत आमिरने सांगितले होते की, ही भेट योगायोगाने झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनी जवळपास 18 महिने एकमेकांना डेट केले. अखेर आता दोघांनी विवाह करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.