आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अल्फा' हा बहुप्रतिक्षित स्पाय ॲक्शन चित्रपट 3 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शना आधी जोरदार प्रमोशन आणि मोठ्या अपेक्षा असतानाही चित्रपटाला पहिल्याच दिवशी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील त्याची सुरुवात निराशाजनक ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 'अल्फा' ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे 9 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर जागतिक बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई 15.80 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सुमारे 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाकडून अधिक दमदार ओपनिंगची अपेक्षा व्यक्त केली जात होती. चित्रपटाचे लेखन उदय चोप्रा यांनी केले असून निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. 'द रेल्वे मेन' फेम शिव रावैल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्यासोबत अनिल कपूर, बॉबी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत, तर ऋतिक रोशन विशेष भूमिकेत दिसतो.
'अल्फा' हा YRF स्पाय युनिव्हर्समधील पहिला महिला-केंद्रित चित्रपट आहे. याआधी 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि 'टायगर 3' यांसारख्या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी 30 ते 60 कोटी रुपयांदरम्यान कमाई करत दमदार सुरुवात केली होती. त्या तुलनेत 'अल्फाची’ ओपनिंग खूपच कमी राहिल्याचे चित्र आहे. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्स आणि कलाकारांच्या अभिनयाचे काही प्रमाणात कौतुक होत असले, तरी कथानक अपेक्षेइतके प्रभावी नसल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून समोर येत आहेत. आता शनिवार-रविवारच्या कमाईत वाढ होते का आणि सकारात्मक 'वर्ड ऑफ माउथ'च्या जोरावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करतो का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #alpha2026 #aliabhatt