AKSHAY KHANNA : भेदक,रुद्र अवतार पाहून चाहते थक्क ! 'महाकाली' मधील अक्षय खन्नाचा शुक्राचार्य लूक पहिला का ? पहा ट्रेलर - टॉप न्यूज मराठी

मनोरंजन : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा आपल्या दमदार ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. बहुप्रतिक्षित 'महाकाली' चित्रपटाचा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला आणि यामध्ये अक्षय खन्नाच्या शुक्राचार्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षय खन्ना असुरांचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये त्याची युद्ध गर्जना आणि रौद्ररूप पाहायला मिळत आहे.

या भूमिकेसाठी अक्षयचा लूक पूर्णपणे वेगळा करण्यात आला आहे. या लूकसाठी हेअर आणि मेकअपवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. लांब, पांढऱ्या जटा, कपाळावर गडद भस्माचे पट्टे, पांढरी शुभ्र लांब दाढी आणि भेदक, लालसर छटा असलेले डोळे असा त्याचा अवतार आहे. चेहऱ्यावर वय आणि तपश्चर्येच्या खुणा दाखवण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे.

त्याच्या डोळ्यातील तीव्रता आणि चेहऱ्यावरील गंभीर भाव शुक्राचार्यांच्या सामर्थ्याची आणि रागाची जाणीव करून देतात. हा लूक केवळ वेशभूषा नसून, पात्राची ताकद दाखवणारा आहे. टीझर प्रदर्शित होताच हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते त्याच्या या नव्या अवताराचे कौतुक करत आहेत.