Akola : तेल्हाऱ्यात सोयाबीन तेलाच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, 35 हजारांचा माल जप्त, परवाना निलंबित - टॉप न्यूज मराठी

अकोला - खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. पॅकिंगवरील माहितीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे सोयाबीन तेलाच्या साठ्यावर छापा टाकण्यात आला आहे.

या कारवाईत अन्न सुरक्षा विभागाने 35 हजार 224 रुपये किमतीचा तेलसाठा जप्त केला आहे. तेल्हारा येथील मे. ताराचंद पालीवाल या पेढीतील 476 पाऊच तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. विविध नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी पेढीचा परवानाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तेल्हारा परिसरातील खाद्यतेल विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयाची दखल घेत अकोला अन्न सुरक्षा विभागाने तेल्हारा येथील मे. ताराचंद पालीवाल या पेढीवर कारवाई केली.

या पेढीत उपलब्ध असलेल्या सोयाबीन तेलाच्या पॅकिंगवरील माहितीमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचा संशय होता. तसेच तेलाच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित झाल्याने अन्न सुरक्षा विभागाने 35 हजार 224 रुपये किमतीचे 476 पाऊच सोयाबीन तेल जप्त केले.

खाद्यतेलासारख्या दैनंदिन वापरातील पदार्थांच्या बाबतीत नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा प्रश्न केवळ व्यावसायिक नियमांचा नाही तर सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचाही आहे.

 प्रतिनिधी : प्रतीक कुऱ्हेकर, अकोला