Akola : अकोल्यावर पाणीबाणीचे संकट, काटेपूर्णा धरणात फक्त 14.88 टक्के पाणीसाठा शिल्लक, शहरात 10 दिवसांआड पाणी - टॉप न्यूज मराठी

अकोला : अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणातील उपयुक्त जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. धरणात सध्या केवळ 14.88 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी 27 ऑक्टोबर रोजी काटेपूर्णा धरण 100 टक्के भरलेले होते. यंदा मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे धरणात अपेक्षित पाण्याची आवक झाली नाही.

आकडेवारी पाहिली तर गेल्या वर्षी या काळापर्यंत 608 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा केवळ 224 मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच यंदा 384 मिलिमीटर पावसाची तूट आहे. कमी पाऊस आणि वाढत्या बाष्पीभवनामुळे जलसाठ्यावर परिणाम झाला आहे.

पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे अकोला महानगरपालिकेने शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलले आहे. शहरात सध्या दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागत आहे.

अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे, त्याआधीच धरणातील पाणीसाठा 14 टक्क्यांवर आल्याने आगामी काळात संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अकोलेकरांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज आहे. प्रशासनाने पर्यायी जलव्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.