Akola : अकोल्यात दुष्काळावरून स्वराज्य संघटना आक्रमक, तेल्हाऱ्यातून सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा - टॉप न्यूज मराठी

अकोला - दुष्काळाच्या प्रश्नावर संभाजी राजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, मात्र शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप स्वराज्य संघटनेने केला आहे.

जाहीर झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हणत आज तेल्हारा शहरात स्वराज्य संघटनेने सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तेल्हारा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून स्वराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी हा इशारा दिला आहे.

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळाची भरीव मदत द्यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे. फसवी कर्जमाफी, पीक विमा आणि दुष्काळाची मदत या मुद्द्यांवर संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकार शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालत असेल तर आम्ही मंत्र्यांची दिवाळी होऊ देणार नाही, असा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी दिला आहे.

 प्रतिनिधी : प्रतीक कुऱ्हेकर, अकोला