Ajinya Rahane : अजिंक्य कर्णधार .. 12 वर्षांचा प्रवास, 3 फॉरमॅटमध्ये ठसा; अजिंक्य रहाणेची तात्काळ निवृत्ती जाहीर - टॉप न्यूज मराठी

क्रीडा : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने गुरुवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 38 वर्षीय रहाणेने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली.

“कॅप क्रमांक 278, चला तर मग. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी सदैव कृतज्ञ राहीन,” असे म्हणत रहाणेने आपल्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला.

12 वर्षांचा प्रवास, 3 फॉरमॅटमध्ये ठसा

2013 मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या रहाणेने देशासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. तांत्रिकदृष्ट्या भक्कम फलंदाजी आणि मैदानावरील शांत स्वभावामुळे तो टीम इंडियाच्या मधल्या फळीचा आधारस्तंभ बनला होता. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला होता. त्यानंतर तो राष्ट्रीय संघात परतला नव्हता. रहाणे हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. आणि विशेष म्हणजे त्याचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड दमदार आहे.

कसोटीत त्याने 6 सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्यापैकी 4 भारताने जिंकले आणि 2 अनिर्णित राहिले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला एकाही कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला नाही. यात 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक मालिका विजयाचाही समावेश आहे, जिथे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने संघाला नेतृत्व दिले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 3 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आणि तिन्ही जिंकले. टी-20 मध्ये 2 पैकी 1 सामना जिंकला.

सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया

रहाणेच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याचा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाला. क्रिकेटप्रेमी, माजी खेळाडू आणि सहकाऱ्यांनी त्याच्या योगदानाचे कौतुक केले. “शांतपणे काम करणारा, टीम फर्स्ट” असा खेळाडू म्हणून रहाणे कायम लक्षात राहील.

आता तो देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळणार का याबत त्याने काहीही स्पष्ट केलेले नाही.

अजिंक्य रहाणेची कारकीर्द एका नजरेत: 

- कसोटी: 85 सामने 

- एकदिवसीय: 90 सामने  

- टी-20 : 20 सामने

- कारकीर्द : 2013 - 2023

- कर्णधारपद : कसोटी 6-0, वनडे 3-0, टी-20 1-1