Ajay Devgan :पान मसाला जाहिराती पाठोपाठ अजय देवगणला आणखी एक धक्का, जुहूतील बंगल्यावर बीएमसीची कारवाई, अनधिकृत बांधकाम पाडले - टॉप न्यूज मराठी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अन्न आणि औषध प्रशासनाने त्याला नोटीस पाठवल्यानंतर आता मुंबई महापालिकेनेही त्याच्यावर कारवाई केली आहे. जुहू येथील त्याच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा चालवला आहे.

महापालिकेने यापूर्वीच अजय देवगणला बांधकाम थांबवण्याची नोटीस दिली होती, मात्र तरीही बांधकाम सुरूच ठेवल्याने ही थेट कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जुहू येथील कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील बंगल्यावर करण्यात आली आहे.

आरोपानुसार या बंगल्यात अंतर्गत बदल करण्यात आले होते. नवीन भिंती उभारणे, खिडक्यांमध्ये बदल करणे आणि इतर काही कामांसाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विनापरवाना हे काम सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पालिकेने याची दखल घेतली होती.

महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354 ए अंतर्गत अजय देवगणला नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये तातडीने काम थांबवावे आणि संबंधित परवानग्यांची कागदपत्रे सादर करावीत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

मात्र नोटीस मिळूनही अजय देवगणकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही आणि बांधकामासाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली नाही. काम जसेच्या तसेच सुरू राहिल्याने अखेर पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला आणि बंगल्यातील काही भागाचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकले.

अजय देवगण सध्या कुटुंबासह याच बंगल्यात राहत असून एफडीएच्या नोटीसीनंतर बीएमसीच्या या कारवाईमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.