टाटा समूहाच्या मालकीची आघाडीची एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमानांच्या नव्या लूकनंतर आता केबिन क्रू आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी नवीन आणि आकर्षक गणवेश तयार केला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून हा नवीन गणवेश संपूर्ण नेटवर्कमध्ये अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. एअरलाइनने भारतीय वस्त्रोद्योगाच्या समृद्ध परंपरेला आधुनिक आणि समकालीन फॅशनमध्ये अतिशय सुंदरतेने गुंफले आहे. या गणवेशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कपडे केळीच्या धाग्यांपासून (बनाना क्रेप फॅब्रिक) तयार करण्यात आले असून, ते पूर्णपणे पर्यावरणपूरक, हलके आणि कडक ड्युटीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी अत्यंत सुटसुटीत आहेत.या नवीन डिझाइनमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता दाखवण्यासाठी तामिळनाडूची कांजीवरम, गुजरातची पटोला, आसामचा गमोसा, हिमाचल प्रदेशचे पट्टू आणि मध्य प्रदेशच्या बाघ प्रिंट या पारंपरिक हस्तकलांचा समावेश करण्यात आला आहे. हा नवा लूक केवळ एअर होस्टेस किंवा फ्लाइट अटेंडंट्सपुरता मर्यादित नसून एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, एव्हिएशन सिक्युरिटी टीम आणि फ्लाइट ऑपरेशन्सशी संबंधित सर्व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या इन-हाउस डिझायनर पूजा कृष्णन यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे डिझाइन केले आहे, तर पुरुष कर्मचाऱ्यांचा गणवेश ट्रेंट लिमिटेड च्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. एअरलाइनच्या 'टेल्स ऑफ इंडिया' या उपक्रमाचा हा एक भाग असून, यामुळे प्रवाशांना विमानतळावर पाऊल ठेवल्यापासून ते विमानातील प्रवासापर्यंत भारतीय आदरातिथ्याचा आणि संस्कृतीचा एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे.