AI आधारित स्मार्ट FIR प्रणालीसाठी डॉ. सागर शेळके यांच्या पेटंट अर्जाची भारत सरकारकडून अधिकृत नोंद - टॉप न्यूज मराठी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर विलास शेळके यांनी विकसित केलेल्या “Portable Artificial Intelligence Based System for Digital FIR Registration and Predictive Crime Analytics” या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नाविन्यपूर्ण प्रणालीच्या पेटंट अर्जाची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयामार्फत अधिकृत नोंद झाली आहे.

सदर प्रणालीमुळे गुन्हे नोंदणी व तपास प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शक्य होणार आहे. प्रत्यक्ष ठिकाणी डिजिटल FIR नोंदणी, आवाज-आधारित माहिती नोंद, गुन्हे नमुने ओळखणे, संभाव्य गुन्ह्यांचे पूर्वानुमान (Predictive Analytics) तसेच गुन्हेगारी हॉटस्पॉट्सचे विश्लेषण या सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होत असून, कायदा अंमलबजावणी यंत्रणेला अधिक अचूक, गतिमान व डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

डॉ. शेळके यांचे हे संशोधन स्मार्ट पोलिसिंग, डिजिटल प्रशासन व तांत्रिक नवोपक्रमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात असून, भविष्यात शासकीय वापर, तांत्रिक विकास तसेच उद्योग क्षेत्राशी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सदर कार्याची दखल घेत श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या कारभारी मंडळाच्या बैठकीत डॉ. सागर शेळके यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी कारभारी मंडळाच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे (माजी महापौर, पुणे), संस्थेचे मानद सचिव अण्णासाहेब थोरात तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. सागर शेळके यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.