Ahilyanagar : सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, रणजितसिंह देशमुख उपाध्यक्ष, विखे-थोरात-गडाख-शिंदे एकत्र आल्याने बिनविरोध निवड - टॉप न्यूज मराठी

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड झाली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली.

जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहमतीने स्थापन झालेल्या सहकार विकास आघाडीने 17 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर अकोले येथील अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनी आघाडीला पाठिंबा दिला, त्यामुळे संख्याबळ 18 वर पोहोचले. आज सकाळी झालेल्या बैठकीत विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या गटाचे दोन संचालक सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे यांनीही विखे आणि देशमुख यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड एकमताने झाली.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय विचारांचे नेतृत्व एका व्यासपीठावर आले. विखे, थोरात, गडाख आणि राम शिंदे या चार प्रमुख नेतृत्वांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी डॉ. सुजय विखे यांनी पार पाडली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकाराच्या हितासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून हा समन्वय साधला गेल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सहकार क्षेत्र नवीन नाही. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, सभासदांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहाराचा त्यांना अनुभव आहे. आता जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या सहकारी वित्तीय संस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.

जिल्हा बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार आहे. शेतकरी, सेवा सहकारी संस्था, विकास सोसायट्या आणि साखर कारखान्यांचे व्यवहार या बँकेशी जोडलेले आहेत. पीककर्ज वेळेत देणे, थकबाकीचा प्रश्न सोडवणे, बँकेची आर्थिक शिस्त राखणे आणि आधुनिक बँकिंग वाढवणे ही आव्हाने नव्या अध्यक्षांसमोर असणार आहेत.

या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या समीकरणाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.