मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि पेरणीच्या स्थितीबाबत *कृषीमंत्री दत्तात्रय भरणे* यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. शेतकरी आत्महत्या, KYC, पेरणी आणि MPSC पेपर फुटीवरही त्यांनी भाष्य केले.
1. कर्जमाफीच्या याद्यांबाबत काय म्हणाले?
कृषीमंत्री भरणे म्हणाले की, "शेतकऱ्यांची यादी सुरू केली आहे. पूर्ण यादी व्हायला वेळ लागेल. कागदपत्र अपलोड होतील तशी यादी तयार होईल. याद्या तीन ते चार टप्प्यांमध्ये येतील.बँकांकडून माहिती घेणे आणि इतर बाबींची पडताळणी करायला वेळ लागतोय."शेतकऱ्यांना सांगणे आहे की पहिल्या यादीत नाव नसलं तरी घाबरू नका. पुढील यादीत नक्की नाव येईल. पात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावं नक्की येतील. जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होतो आहे.
एकूण 56 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे."
2. शेतकरी KYC आणि कर्जमाफी
- "KYC पूर्ण करण्यासाठी नक्की मदत केली जाईल."
- "कर्जमाफी पासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल."
- "ग्रामीण भागात जिथे अडचणी येत असतील तर बँक अधिकारी नक्की मदत करतील."
3. यवतमाळ शेतकरी आत्महत्येवर
यवतमाळमधील चुडके नावाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येवर बोलताना ते म्हणाले,
"त्यांच्यावर वेळ का आली याची तपासणी होईल. जर ते लाभार्थी पात्र असतील तर त्यांना लाभ देण्यात आला असता. लाभार्थी असतील तर नक्की त्यांना मदत केली जाईल."
4. पेरणीचा अहवाल
- "पेरणीचा अंदाज घेतला आहे. आज खरीप क्षेत्रातील साधारण 82 टक्के पेरणी झाली आहे."
- "2025 च्या तुलनेत पेरणी वाढत चालली आहे."
- "अजून 8 दिवसात जे उद्दिष्ट आहे तेवढी पेरणी नक्की होईल."
5. ड्रग निरीक्षक पेपर फुटीवर
MPSC औषध निरीक्षक पेपर फुटीच्या आरोपांवर ते म्हणाले,
"पेपर फुटला असं म्हणता येत नाही. 60 ते 70 प्रश्न आपण शाळेत म्हणायचो की ते प्रश्न येतात. पण पेपर फुटला असेल तर सरकार चौकशी करेल."