मुंबई : मराठी सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेते आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी सोळा वर्ष संसार केला. या दोघांना जिजा नावाची एक मुलगी देखील आहे. परंतु दोघेही जण सोळा वर्षे संसार केल्यानंतर परस्पर संमतीने विभक्त होत असल्याचं दोघांनी जाहीर केले.
खरंतर दोघेही जण अभिनय क्षेत्रात आहेत. पती-पत्नी म्हणून विभक्त होत असताना ही एक खाजगी बाब आहे. परंतु ऑफ स्क्रीन ज्या जोडीला मराठी प्रेक्षक पसंत करत होते. त्यांना अचानक मिळालेल्या या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
याविषयी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर या दोघांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, " आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनी खूप विचार केल्यानंतर आम्ही आदिनाथ महेश कोठारे आणि उर्मिला कानिटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा तिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील. गेल्या काही वर्षात मीडिया आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे. त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद .आदिनाथ आणि उर्मिला ! " अशी पोस्ट या दोघांनी सोशल मीडियावर केली आहे.