ACCIDENT : चाकण MIDC रस्त्यावर पुन्हा अपघात ! खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली, 2 जणांचा जागीच मृत्यू - टॉप न्यूज मराठी

पुणे : चाकण MIDC परिसरातील खराब रस्त्यांमुळे पुन्हा एकदा दोन निष्पापांचा बळी गेला आहे. तळेगाव-चाकण महामार्गावर शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खड्डे झाले होते. याच दरम्यान एका कंटेनरने ओव्हरटेक करताना अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणारी दुचाकी स्लीप झाली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली दुचाकीस्वार सापडले. या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

ही गेल्या एका महिन्यातील सहावी घटना आहे. खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चाकण परिसरात वारंवार अपघात होत आहेत. स्थानिक नागरिक आणि कामगार अनेक दिवसांपासून रस्ते दुरुस्तीची मागणी करत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.

या अपघातांमुळे केवळ जीवितहानी होत नाही तर चाकण MIDC मधील उद्योगांनाही फटका बसत आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे कामगारांना वेळेवर पोहोचता येत नाही. मालाची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. याला कंटाळून MIDC मधील जवळपास 20 कंपन्या इतर राज्यात किंवा महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत.

नागरिकांचा संताप आता वाढला आहे. "रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत आणखी किती बळी जाणार?" असा प्रश्न विचारला जात आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवणे, चिखल काढणे आणि अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत.