ACCIDENT : चेन्नईत ए.आर. रेहमान यांच्या मुलाचा कार अपघात, पोर्शे कारची रॅपिडोला धडक - टॉप न्यूज मराठी

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए.आर. रेहमान यांचा मुलगा AR अमीन याला सोमवारी पहाटे चेन्नईत कार अपघाताला सामोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 3.30 वाजता गिंडी परिसरातील ऑलिम्पिया टेक पार्क सिग्नलजवळ अमीन त्याचा मित्र भार्गवसोबत पोर्शे कारने जात होता. याचवेळी त्यांच्या आलिशान कारने समोरून येणाऱ्या एका रॅपिडो वॅगन-आर टॅक्सीला जोरदार धडक दिली.

या धडकेत अमीन आणि त्याचा मित्र दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोघांची प्रकृती स्थिर आहे आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. मात्र, या अपघातात रॅपिडो कारचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासले जात आहे.

कोण आहे AR अमीन ?

AR अमीन हा ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 6 जानेवारी 2003 रोजी झाला. वडिलांप्रमाणेच त्यानेही संगीत क्षेत्र निवडले आहे. 2015 मध्ये मणी रत्नम यांच्या ‘ओ कधल कनमनी’ मधील ‘मौला वा सल्लीम’ गाण्याने त्याने गायक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर ‘2.0’ सारख्या चित्रपटांसाठी त्याने काम केले. 2019 मध्ये ‘सागो’या गाण्याद्वारे त्याने संगीत निर्माता म्हणूनही ओळख निर्माण केली. 2022 मध्ये BTS सोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.