छत्रपती संभाजीनगर : देशभरात सध्या चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील वाटचालीबाबत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. पक्षाची पुढची रणनीती काय असावी यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांत सीजेपीने जे आंदोलन उभे केले त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. सरन्यायाधीशांच्या एका निरीक्षणानंतर सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ आता रस्त्यावर उतरली आहे. अवघ्या काही महिन्यात 12 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारला धारेवर धरण्यात आणि शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात या तरुणांच्या गटाला यश मिळाले. त्यामुळे आता सीजेपी निवडणुकीत उतरणार का, असा प्रश्न सर्वांना पडला होता.
बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी यावर थेट उत्तर दिले. "मीडियाला फार घाई झाली आहे आम्हाला राजकीय पक्ष बनवायची. पण देशात आधीच एवढे राजकीय पक्ष आहेत की लोक कंटाळले आहेत. तुम्ही स्वतःच त्यांच्यामुळे नाराज आहात. आम्हाला हा पक्ष राजकीय बनवायचा नाही. ही एक सामाजिक चळवळ म्हणूनच राहील. सध्याच्या राजकारणात आणखी एक पक्ष टाकून काय फायदा?" असा सवाल त्यांनी केला.
दीपके पुढे म्हणाले की लोकांचा राजकारणावरचा विश्वासच उडाला आहे. सकाळी ज्याला मत देतो तो संध्याकाळपर्यंत पक्ष बदलतो. सकाळी एक आमदार दिसतो आणि रात्री तो दुसऱ्या गटात जातो. अशा स्थितीत नवीन पक्ष काढण्यापेक्षा व्यवस्थेवर दबाव आणणारी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.
सध्या CJP ला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. शिक्षण, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर हा गट रस्त्यावर उतरत आहे. आजच्या बैठकीत पुढील आंदोलनांची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि राज्यभरातील समन्वयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणूक न लढवता दबावगट म्हणून काम करण्याचा निर्णय या बैठकीत पक्का झाल्याचे मानले जात आहे.