दिल्ली : महिना उलटून गेला तरीही कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच आहे. आज दुपारी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुख मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर हे आंदोलन आता शांत होईल असे वाटत असतानाच दीपके यांनी मात्र हे आंदोलन अजूनही सुरूच आहे असे म्हटले आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागणीनुसार नीट पेपर फुटी प्रकरणी संपूर्ण जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा आज दुपारी राजीनामा दिला आहे. परंतु नीट पेपर फुटी प्रकरणातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी आर्थिक मदत आणि मोर्च्याच्या दिवशी ज्या आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला त्या पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन अजूनही सुरू असल्याचे अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे.
अभिजीत दीपके यावेळी म्हणाले की, "आता राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपले, असे गृहीत धरले जाईल. परंतु आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत, "असेही ते म्हणाले. "ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना एक कोटीची आर्थिक मदत दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाठीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत" अशी भूमिका आता अभिजीत दीपके यांनी मांडली आहे.
यावर आता सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.