दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले "कॉकरोच जनता पार्टी" CJP चे आंदोलन आजही सुरू आहे. दरम्यान CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी आज जंतर-मंतरवरील आंदोलनातून काही काळासाठी विश्रांती घेतली आहे.
सोशल मीडियावरून माफी मागितली
अभिजीत दीपके यांना आज ताप आल्याने डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सर्व आंदोलनकर्ते आणि विद्यार्थ्यांची माफी मागितली.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "मी जर आज जंतर-मंतरवर दिसलो नाही तर मला माफ करा. मला आराम करण्याची आणि तब्येत व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. लवकरच बरे होऊन पुन्हा आंदोलनात सामील होईन."
आंदोलनाची प्रमुख मागणी काय?
महिना उलटूनही CJP चे आंदोलन थांबले नाही. NEET पेपर लीक, परीक्षा घोटाळे आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ ही चळवळ सुरू झाली आहे.
CJP ची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे. "शिक्षण व्यवस्थेतील अपयशाची जबाबदारी मंत्र्यांनी स्वीकारावी" अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
अभिजीत दीपके यांनी तब्येत सुधारल्यानंतर पुन्हा जंतर-मंतरवर येऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत CJP चे इतर सदस्य आणि विद्यार्थी संघटना आंदोलन पुढे चालू ठेवणार आहेत.