मुंबई : केंद्र सरकारने पहिल्या तिमाहीचा GDP 7.8 टक्के असल्याचे जाहीर करताच राजकारण तापले आहे. सरकार या आकडेवारीवरून विकासाचे ढोल वाजवत असताना विरोधकांनी आकडेवारीच खोटी असल्याचा आरोप केला आहे.
1. महागाई विरुद्ध आकडेवारी: बाजारात महागाईचा भडका उडाला असताना GDP वाढ कशी झाली, असा सवाल विरोधकांचा आहे. ही आकडेवारी सामान्यांच्या जगण्याशी जुळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
2. मोजणीच्या पद्धतीवर आक्षेप: माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्यासह काही अर्थतज्ज्ञांनी GDP मोजण्याच्या नवीन पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. सरकारने गेल्या काही वर्षांत पद्धत बदलल्याने आकडा फुगवून दाखवला जात असल्याचा आरोप आहे.
3. काँग्रेसचा 'बिअर फेस' टोला: केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर बिअरच्या मगचा फोटो शेअर करत सरकारवर निशाणा साधला. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे बिअर आणि GDP चा आकडा म्हणजे त्यावरचा फेस, जो लगेच विरून जाईल, अशी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्रावर टीका केली आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री अर्थव्यवस्था चांगली असल्याचे चित्र रंगवत आहेत, पण जमिनीवरील दुखणं वेगळंच आहे. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गोष्टी बोलल्या जात आहेत, पण प्रत्यक्षात सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे, असे पवार म्हणाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसला देशाची प्रगती पाहवत नसल्याचे म्हटले आहे. तर सांख्यिकी मंत्रालयाने (MoSPI) GDP गणनेची पद्धत पारदर्शक आणि योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.