देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांसह बारामती व राहुरी येथील पोटनिवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी
या निवडणुकीत सर्वात जास्त चुरस पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप आणि सत्ताधारी यांच्यात अटीतटीची लढाई दिसून आली. मात्र, भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठी झेप घेत विजय संपादन केला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानताना म्हटले की, "आजपासून बंगाल 'भयमुक्त' आणि 'विकासयुक्त' झाला आहे." बंगालमधील जनतेने विकासाच्या राजकारणाला साथ दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या या विजयामुळे बंगालच्या राजकारणात मोठे सत्तांतर पाहायला मिळत आहे.
दक्षिण भारत आणि आसामचा कौल
आसाममध्ये भाजपने आपली पकड मजबूत ठेवत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तर पुद्दुचेरीमध्येही भाजप प्रणीत आघाडीने आघाडी घेतली आहे. दक्षिण भारताचा विचार करता, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक निकाल
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही आज जाहीर झाले. बारामतीमध्ये 2 लाखांकडून अधिक मताधिक्य सुनेत्रा पवार विजयी झाल्या तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी झाले आहेत.