पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३८वे वर्ष साजरे करीत आहे. यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव काळात ‘पुणे फेस्टिव्हल’ संपन्न होईल. याचे उद्घाटन शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता उपराष्ट्रपती मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुणे फेस्टिव्हल एडवाइजरी कमिटीचे चेअरमन चंद्रकांतदादा पाटील, पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच खा. मेधा कुलकर्णी, महसूल राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि विकास पानसरे, संचालक पर्यटन संचालनालय , मुंबई पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, पुणे फेस्टिव्हलचे जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाचे विभागीय प्रकल्पाधिकारी मयूर नांद्रे हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पुणे फेस्टिव्हल लोगोचे अनावरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘अंध मुक्त पुणे’ चळवळीचा भाग म्हणून पुणे फेस्टिव्हल व अलायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम होणाऱ्या श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विशेष कक्ष उभारून नेत्रदान फॉर्म दिले जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे नमूद करून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी ‘रेडीओ मिर्ची’ हे रेडीओ पार्टनर बनल्याचे सांगितले.
पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस यंदाचा ३८ वा पुणे फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला आहे. त्यांच्या योगदानावर आधारित ९ मिनिटांची चित्रफित यावेळी दाखवली जाणार आहे. मुंबईच्या नक्षत्र मिडिया वर्कचे संजोग देसाई यांनी ही चित्रफित तयार केली आहे.
श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘भव्य उद्घाटन सोहळा’, 'सुफी संगीत’, ‘केरळ महोत्सव’,'हिंदी हास्य कवी संमेलन',अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा' आणि एम.एच.जे. लाईव्ह (हास्यजत्रा) हे प्रमुख कार्यक्रम असतील. यासोबत बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शने, विविध क्रीडा स्पर्धा ही देखील यंदाच्या पुणे फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये असतील. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. त्यावेळी त्यामध्ये कथाकथन, कीर्तन, पोवाडे, लोककला, मेळे असे कार्यक्रम होत असत. यापासूनच प्रेरणा घेऊन १९८९मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केली. सलग १० दिवस आणि ३८ वर्षे सुरू असलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरू झाले. त्यामुळे पुणे फेस्टिव्हलला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल्स’ म्हटले जाते.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना पद्मश्री खा. हेमा मालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन आहेत.
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.
३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रींची’ प्रतिष्ठापना'- सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुश्री चौधरी यांच्या हस्ते विधिवत संपन्न होईल. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी याचे पौराहित्य करतील.
३८ व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे एम.टी.डी.सी., कोहिनूर ग्रुप, सुमाशिल्प लिमिटेड आणि प्राइड ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून पंचशील आणि भारत फोर्ज सहप्रायोजक आहेत सुहाना, एनईसीसी, कुमार प्रॉपर्टीज आणि अहुरा बिल्डर्स हे उपप्रायोजक आहेत.
विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘जीवन गौरव पुरस्कार', तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविले जाते. यंदा पासून दिला जाणारा संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कारने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना गौरवले जाणार आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक किरण शांताराम, ज्येष्ठ नाट्यलेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्ष अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांना पुणे फेस्टिव्हल अवॉर्डने गौरवले जाईल.
सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळांचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जय गणेश' पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा रणमर्द शिवाजी मंडळ, नेहरू चौक,शुक्रवार पेठ, आणि श्री. हनुमान मंडळ प्रतिष्ठान, माणिक चौक, कसबा पेठ, यांना या पुरस्काराने गौरविले जाईल.
उद्घाटन सोहळा – दरवर्षी प्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक असेल. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती होईल.
या उद्घाटन सोहळ्यात नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक बघायला मिळेल.
गणेश वंदना - उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ ज्येष्ठ नृत्यगुरु शर्वरी जेमिनीस यांच्या कथक नृत्यशैलीतून साकारला जाईल. त्यांच्या शर्वरी जेमिनीस डान्स कंपनीच्या १० शिष्या सहकलावंत असतील. 'शेंदूर लाल चढायो' या ज्येष्ठ गायक महेश काळे यांनी गायलेल्या प्रसिद्ध आरतीवर ही गणेशवंदना सादर होईल.
‘महाराष्ट्र सन्मान गीत’ – भारती विद्यापीठ डीम युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे ५० विद्यार्थी महाराष्ट्र सन्मान गीत सादर करणार आहेत.
'वसुधैवकुटुंबकम'- सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा नृत्याविष्कार सादर होईल. याचे दिग्दर्शन संचालिक अमृता रुईकर यांनी केले आहे. यामध्ये १५ भारतीय आणि २० देशातील २३ परदेशी विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्यामध्ये युगांडा, झिम्बाब्वे, द गॅम्बिया, सौदी अरेबिया, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, संयुक्त अरब अमिराती (युएई), लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, माली, फिजी, नायजेरिया, दक्षिण सुदान, आयव्हरीकोस्ट,ब्राझील, जर्मनी, बेल्जियम,अर्जेंटिना या २० देशातील २३ परदेशी विद्यार्थी सहभागी होत आहेत. 'वन वर्ल्ड - वन फॅमिली' या सूत्रावर आधारित हे विद्यार्थी आपापल्या देशाच्या संस्कृतीचे संगीत व नृत्याविष्कारातून दर्शन घडवतील.
'चक दे इंडिया'- मागील वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने भारतात झालेली जागतिक महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला. त्याच्या सन्मानार्थ'चक दे इंडिया' हा नृत्याविष्कार सादर होईल याची संकल्पना व दिग्दर्शन अॅड. अनुराधा भारती यांची आहे. यामध्ये पेंटिंग,नृ त्य, शंखवादन व नृत्याविष्कारामधून तिरंगा सादर केला जाईल. महाराष्ट्राचा महिला क्रिकेट संघ यामध्ये सहभागी होत आहे. यावेळी ९ नृत्यांगना, १३ महिला शंख वादक, निवेदिता प्रतिष्ठान आकृती ग्रुपच्या १० महिला चित्रकार आणि महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीच्या १२ महिला क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. यामध्ये शेवटी सर्व कलावंत आपल्या कलाकृतीतून व शंखाच्या घोषात तिरंगा सादर करतील.
'झनक झनक पायल बाजे'- ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जन्मजयंती निमित्त 'झनक झनक पायल बाजे' हा त्यांच्या स्मृतींना श्रद्धासुमने अर्पण करणारा कार्यक्रम 'पायल वृंद' तर्फे सादर केला जाणार आहे. अभिनेत्री मानसी नाईक, भार्गवी चिरमुले व सहकलावंत यांचा यात सहभाग असेल. याची संकल्पना व दिग्दर्शन 'पायल वृंद'च्या नृत्यगुरु निकिता मोघे यांनी केले आहे.
'वंदे मातरम्'- वंदे मातरम' या आपल्या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. ज्येष्ठ कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या गीताने कोट्यावधी भारतीयांच्या मनात चैतन्य निर्माण होते. SNSS शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या नृत्यांगनांकडून या अमर गीतावर नृत्य सादरीकरण करुन मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे. सर्व नृत्यांगनांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरुपात अमीरा पाटणकर नादरूप संस्था, अरुंधती पटवर्धन कलावर्धिनी डान्स कंपनी व रसिका गुमास्ते आकांक्षा ओडिसी नृत्यालय यांच्या तर्फे कथक, भरतनाट्यम् आणि ओडिसी या नृत्यशैलींचा सुंदर संगम या गीतावर सादर होईल. यात २४ नृत्यांगनांचा सहभाग असून ज्येष्ठ नृत्यगुरु क्षमा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे मराठीतून राहुल सोलापूरकर आणि इंग्रजीतून समीरा गुजर सूत्रसंचालन करतील.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी सायं. ७ वाजता 'सुफी संगीत', रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ‘केरळ महोत्सव’ व सायं. ७ वाजता 'हिंदी हास्य कवी संमेलन', सोमवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायं. ७ वाजता 'मराठी बाणा' आणि मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायं. ७ वाजता एम.एच.जे लाईव्ह (हास्यजत्रा) हे विशेष कार्यक्रम संपन्न होतील.