37 व्या पुणे फेस्टिव्हलची घोषणा : गणेश कला-क्रिडा मंचावर उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती - टॉप न्यूज मराठी

पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन यांचा मनोहारी संगम असलेल्या पुणे फेस्टिव्हलच्या 37 व्या वर्षाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. यंदा 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव काळात हा महोत्सव साजरा होणार आहे.

पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व फेस्टिव्हल अडव्हायझरी कमिटीचे चेअरमन चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुभाष सनस, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री हेमा मालिनी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

12 दिवस काय असणार विशेष ?

संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश कलमाडी यांच्या संकल्पनेतून गेली 38 वर्षे हा उत्सव अखंड सुरू आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गणेश चषक क्रीडा स्पर्धा, गझल समारंभ, हिंदी-मराठी कवी संमेलन, महिला कुस्ती, मल्लखांब, लेझीम स्पर्धा, दिव्यांगांसाठी विशेष स्पर्धा, भेळ उत्सव, पुष्प प्रदर्शन आणि पारंपारिक वाद्यांचे वादन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

क्रिडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा गणेश चषक पुरस्कार आतापर्यंत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांना मिळाला आहे. तसेच भारती विद्यापीठ आणि पुणे फेस्टिव्हलच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र सन्मान गौरव पुरस्कार हा देखील या फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण असते.

या फेस्टिव्हलचे आयोजन द पीपल ऑफ पुणे फेस्टिव्हल कमिटी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.