पुणे : ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिले जाणारे मानाचे ‘महर्षी’ पुरस्कार यंदा गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रदान केले जाणार आहेत. ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते मंदिर स्थापत्य तज्ञ डॉ. गो. ब. देगलूरकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि ज्येष्ठ गायक श्रीधर फडके हे यंदाच्या ‘महर्षी’ पुरस्काराचे मानकरी आहेत अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
या कार्यक्रमात डॉ. गो. ब. देगलूरकर, उषा मंगेशकर आणि श्रीधर फडके यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ निवेदिका सुकन्या जोशी (मुंबई) या घेणार असून उषा मंगेशकर आणि श्रीधर फडके यांची निवडक गीते याप्रसंगी सादर केली जातील. यानंतर लगेचच प्रख्यात गायक जितेंद्र भूरूक, मकरंद पाटणकर आणि मेधा चांदवडकर किशोर कुमार यांच्या पुण्यतिथी निमित्त खास हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील.
महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे हे ‘महर्षी’ पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील असे आबा बागुल यांनी सांगितले.
यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, शोभना रानडे, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. बुधाजीराव मुळीक, बी.आर. खेडकर, बाबा महाराज सातारकर, चंदू बोर्डे, लीला पूनावाला, सूर्यकांत फाटक, उल्हास पवार, मोहन धारिया, डॉ. विजय भटकर, किशोरी अमोणकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रतापराव पवार इत्यादींना यापूर्वी ‘महर्षी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.