31 वर्षांपूर्वीच्या ‘मुझको राणा जी माफ करना’चा पाकिस्तानी रिमेक पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावर टीकेची झोड - टॉप न्यूज मराठी

‘करण अर्जुन’मधील अलका याज्ञनिक यांच्या सुपरहिट गाण्याच्या पाकिस्तानी आवृत्तीवर नेटकऱ्यांची नाराजी; ‘मूळ गाण्याची जादूच वेगळी’ अशा प्रतिक्रिया

बॉलिवूडच्या 90 च्या दशकातील अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी ‘करण अर्जुन’ चित्रपटातील ‘मुझको राणा जी माफ करना, गलती म्हारे से हो गई’ हे गाणे आजही तितक्याच उत्साहाने ऐकले जाते. अलका याज्ञनिक आणि इला अरुण यांच्या आवाजातील हे गाणे लग्नसमारंभांपासून विविध कार्यक्रमांपर्यंत आजही लोकप्रिय आहे.

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटात शाहरुख खान, सलमान खान, काजोल, राखी आणि ममता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटासोबतच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेषतः ‘मुझको राणा जी माफ करना’ या गाण्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी यांची लोकप्रियता आणखी वाढली. या गाण्याची लोकप्रियता भारताबाहेरही पोहोचली आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये या गाण्याची एक आवृत्ती तयार करण्यात आली. 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘बनारसी चोर’ या पाकिस्तानी चित्रपटात या गाण्याचा रिमेक करण्यात आला. या चित्रपटात आबिद अली, नरगिस आणि रीमा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मात्र, या रिमेकला मूळ गाण्यासारखी लोकप्रियता मिळू शकली नाही. गाण्याच्या सादरीकरणापासून ते चित्रीकरणापर्यंत अनेक बाबींवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली. काही नेटकऱ्यांनी मूळ गाण्याची तुलना करत ही आवृत्ती अपेक्षांवर खरी उतरली नसल्याचे म्हटले, तर काहींनी ‘मूळ गाण्याची जादूच वेगळी होती’ अशा प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, अनेक वर्षांनंतर हा पाकिस्तानी रिमेक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला असून, बॉलिवूडच्या या लोकप्रिय गाण्याची आठवण चाहत्यांना पुन्हा झाली आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #bollywood