300 रुपयांच्या मजुरीवरून 25 लाखांच्या ट्रॉफीपर्यंत, अनाथ असूनही अख्ख्या महाराष्ट्राला आई बाप मानणारा गुलीगत स्टार, सूरज चव्हाणची डोळ्यात पाणी आणणारी यशोगाथा - टॉप न्यूज मराठी

व्यक्तिविशेष : महाराष्ट्राने अनेक स्टार पाहिले पण बारामतीच्या मोडवे गावातून आलेला आणि बोबड्या बोलाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा स्टार म्हणजे सूरज चव्हाण. आज तो सोशल मीडियावर राजा आहे पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.

जन्म आणि कुटुंब

सूरज चव्हाणचा जन्म 1992 साली पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे या छोट्याशा गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडील शेळ्या पाळून कुटुंब चालवायचे. सूरजला पाच मोठ्या बहिणी आहेत. सूरज लहान असतानाच त्याच्या आयुष्यात मोठा आघात झाला. त्याच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि काही काळातच आई आणि आजी या दोघींचे एकाच दिवशी निधन झाले. आई वडिलांचे छत्र हरपल्याने सूरज पोरका झाला.

शिक्षण

घरात कमवणारे कोणीच नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले. सूरजने फक्त आठवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याला आजही व्यवस्थित मराठी वाचता येत नाही. पण परिस्थितीने त्याला शाळा सोडायला लावली. त्यानंतर त्याने आपल्या बहिणींसोबत राहून कुटुंबाचा गाडा ओढला. त्याची आत्या कल्पना जाधव आणि बहीण सीता खोमणे यांनी त्याला लहानाचे मोठे केले.

संघर्षाचा काळ

शिक्षण सोडल्यानंतर सूरजने मोलमजुरी सुरू केली. शेतात रोजंदारी करणे, कोंबडखत भरणे, बांधकामावर विटा उचलणे अशी कामे तो दिवसाला 300 रुपयांसाठी करायचा. लोक त्याला हसायचे, टोमणे मारायचे. पण त्याने कधीच हार मानली नाही.

सोशल मीडियावर एंट्री

सूरजच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्याच्या बहिणीच्या मुलामुळे. त्याने सूरजला टिकटॉक नावाचे अँप दाखवले. सूरजने दुसऱ्याच्या मोबाईलवर पहिला व्हिडिओ बनवला आणि तो रात्रोरात व्हायरल झाला. त्याची बोबडी भाषा, त्याचे खास डायलॉग जसे की गुलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ, झापूक झुपूक, आई मरीमाता हे लहान मुलांच्या तोंडावर आले. पण पुन्हा संकट आले, भारतात टिकटॉक बॅन झाला. अनेकजण असते तर थांबले असते पण सूरजने इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडिओ बनवणे सुरू केले आणि तिथे तर तो सुपरस्टारच झाला.

चित्रपटातील कारकीर्द

सोशल मीडियाच्या लोकप्रियतेमुळे त्याला चित्रपटात काम मिळाले. त्याने मुसंडी 2023 आणि राजा राणी 2024 या मराठी चित्रपटात काम केले. त्याच्या नैसर्गिक अभिनयाचे लोकांनी कौतुक केले.

बिग बॉस मराठी 5 मधला प्रवास

सूरजच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे बिग बॉस मराठी 5. सुरुवातीला तो या शो मध्ये यायलाच तयार नव्हता. बिग बॉसच्या टीमने अनेकदा त्याला समजावले. घरात गेल्यावर सुरुवातीला लोक म्हणायचे याला गेम कळत नाही. पण त्याचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि भोळेपणाने त्याने महाराष्ट्राची मने जिंकली. 100 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर त्याने अभिजीत सावंत सारख्या मोठ्या गायकाला मागे टाकत बिग बॉस मराठी 5 ची ट्रॉफी जिंकली. त्याला 14.6 लाख रुपये रोख, 10 लाखांचे ज्वेलरी व्हाउचर आणि एक इलेक्ट्रिक बाईक मिळाली. तो बिग बॉस जिंकणारा पहिला रील स्टार ठरला.

आजचा सूरज

आज सूरज चव्हाणकडे सगळे काही आहे. पैसा, प्रसिद्धी, घर. घरकुल योजनेतून मिळालेल्या घरातून तो आता स्वतःच्या हक्काच्या घरात राहतो. अजित पवार यांनी सुद्धा त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजही तो तितकाच जमिनीवर आहे. तो आजही स्वतःला अनाथ समजत नाही कारण अख्खा महाराष्ट्रच माझे आई वडील आहेत असे तो नेहमी म्हणतो. त्याची हीच भावना त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते.