3 चोरटे, 3 दुकानं अन् एका रात्रीत "डल्ला"; पिंपरी- चिंचवडमधील व्यापाऱ्यांमध्ये दहशत - टॉप न्यूज मराठी

पिंपरी- चिंचवडमध्ये चोरट्यांच्या टोळीचा सुळसुळाट पाहायला मिळत आहेत. 

देहूरोड परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल 3 दुकानांवर डल्ला मारला. 

त्यामुळे समस्त व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

या चोरीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून दुकानांतील साहित्यही अस्ताव्यस्त करण्यात आलंय. 

चोरीची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहेत.

देहूरोड परिसरातील बाजारपेठेतील जगन्नाथ खंडेलवाल यांचे घाऊक किराणा दुकान, देहूरोड रेल्वे स्थानकाजवळील ओम मेडिकल तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बालाजी ट्रेडिंग या तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या. तीनही दुकानांची कुलूपं तोडून चोरट्यांनी रोकड आणि काही मुद्देमालाचे चोरी केली. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यात हे तीन चोर आढळून आले‌. मोठ्या शिताफीनं या चोरट्यांनी तीन ठिकाणी धाडसी चोरी केल्याचं दिसून येत आहे. तसेच चोरी करून जाताना सर्व सामान अस्ताव्यस्त केल्याचही आढळून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींची ओळख निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गात धास्तीचं वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.