22 वर्षे एकट्याने डोंगर फोडणारा माऊंटन मॅन, पत्नीच्या मृत्यूने पेटून उठला, लोकं वेडा म्हणायचे, आज त्याच्या नावावर टपाल तिकीट आणि चित्रपट, दशरथ मांझी यांची अंगावर काटा आणणारी खरी सत्यकथा - टॉप न्यूज मराठी

बिहारमधील गया जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे, गेहलौर. या गावाभोवती एक मोठा डोंगर उभा होता. हा डोंगर गावकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू होता. कारण गावातून जवळच्या वजीरगंज शहरात जायचं असेल तर डोंगराला वळसा घालून 55 किलोमीटर फिरून जावं लागायचं. दवाखाना, शाळा, बाजार, नोकरी, सगळं त्या डोंगराच्या पलीकडे होतं. वेळेवर दवाखाना मिळाला नाही म्हणून अनेक लोकं मेली होती. पण कुणीही या डोंगराला हात लावायची हिंमत केली नव्हती.

याच गावात 14 जानेवारी 1934 रोजी दशरथ मांझी यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब, दलित कुटुंब. लहानपणीच घर सोडून धनबादच्या कोळशाच्या खाणीत काम केलं. नंतर गावी परत आले आणि फाल्गुनी देवी यांच्याशी लग्न झालं. रोजंदारीवर काम करून घर चालवायचे. जगण्यासाठी झगडणारा एक सामान्य मजूर, हेच त्यांचं आयुष्य होतं.

पण 1959 ते 1960 च्या सुमारास एक घटना घडली आणि त्यांचं आयुष्य कायमचं बदललं. एक दिवस फाल्गुनी देवी डोंगरावरून पाणी आणि जेवण घेऊन दशरथ यांच्याकडे येत होत्या. वाटेत पाय घसरला, त्या खोल दरीत पडल्या. डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागला. त्यांना तात्काळ दवाखान्यात नेणे गरजेचे होते. पण डोंगरामुळे दवाखाना 55 किलोमीटर दूर होता. वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि फाल्गुनी देवींचा मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूने दशरथ पूर्णपणे खचले. पण खचून बसण्याऐवजी त्यांनी एक असा निर्णय घेतला, जो ऐकून गावकऱ्यांना वेडेपणा वाटला. ते म्हणाले, माझ्या पत्नीला जो डोंगर मारून टाकलं, तोच डोंगर मी फोडणार. कुणाच्याही पत्नीचा, कुणाच्याही आईचा, कुणाच्याही मुलाचा असा मृत्यू होऊ देणार नाही.

दुसऱ्या दिवसापासून दशरथ हातात हातोडा आणि छिन्नी घेऊन डोंगरावर जायला लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकटेच दगड फोडायचे. पोटासाठी मजुरी करायचे आणि उरलेला वेळ डोंगरावर घालवायचे. सोबत फक्त सत्तू, पाणी आणि जिद्द होती. लोकांनी सुरुवातीला हसून सोडून दिलं. नंतर त्यांना वेडा म्हणायला लागले. काहींनी तर त्यांना भूत लागलंय असंही म्हटलं. पण दशरथ थांबले नाहीत.

1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर तब्बल 22 वर्षे त्यांनी हे काम केलं. 1960 ते 1982, सलग 22 वर्षे. कधी ऊन, कधी पाऊस, कधी थंडी, कधी उपाशीपोटी. पण हातोडा थांबला नाही. शेवटी त्यांनी डोंगरातून 110 मीटर लांब, 9.1 मीटर रुंद आणि 7.7 मीटर खोल रस्ता तयार केला. हा रस्ता तयार झाल्यावर गेहलौर ते वजीरगंज हे अंतर 55 किलोमीटरवरून थेट 15 किलोमीटरवर आले. आज हजारो लोकं या रस्त्याने दररोज ये-जा करतात. शाळेत जाणारी मुलं, दवाखान्यात जाणारे रुग्ण, कामाला जाणारे मजूर, सगळ्यांचा प्रवास सोपा झाला.

या कामानंतर दशरथ मांझी यांना माऊंटन मॅन म्हणून ओळख मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांच्या कामाची दखल देशभरात घेतली गेली. 17 ऑगस्ट 2007 रोजी कॅन्सरमुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले. बिहार सरकारने त्यांना शासकीय इतमामात निरोप दिला. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटही काढले.

दशरथ मांझी यांच्या या खरी सत्यकथेवर 2015 मध्ये एक चित्रपटही आला, मांझी द माऊंटन मॅन. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी दशरथ मांझी यांची भूमिका केली होती, तर राधिका आपटे यांनी त्यांच्या पत्नी फाल्गुनी देवी यांची भूमिका केली होती. दिग्दर्शक केतन मेहता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटात दशरथ यांचा संघर्ष, लोकांची टोमणे, उपाशीपोटी केलेले काम आणि 22 वर्षांची जिद्द अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. आजही हा चित्रपट जिद्द आणि प्रेमाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणून पाहिला जातो.

दशरथ मांझी यांची कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. माणूस एकटा असला, गरीब असला, शिक्षण नसलं तरी त्याच्यातली जिद्द डोंगरापेक्षा मोठी असते. प्रेमासाठी माणूस काय करू शकतो, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दशरथ मांझी.