'2029 ला सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं' जय पवारांनी बोलून दाखवली मनातली इच्छा - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या बारामतीत आज पुन्हा एकदा राजकीय चर्चेला मोठे उधाण आले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी आयोजित केलेल्या 'जनता दरबारात' जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तर झालीच,

 पण त्यासोबतच त्यांनी केलेल्या एका विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "२०२९ ला सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावे," 

अशी जाहीर इच्छा व्यक्त करत जय पवार यांनी भविष्यातील राजकीय रणनीतीचे संकेत दिले आहेत.

'जनता दरबारा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद 

बारामती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जय पवार यांनी या विशेष दरबाराचे आयोजन केले होते. 

सकाळपासूनच बारामतीकरांनी येथे मोठी गर्दी केली होती. लोकांचा हा प्रतिसाद पाहून जय पवार म्हणाले की, "दादांनी केलेल्या विकासकामांवर जनतेचा आजही तितकाच गाढ विश्वास आहे, हे या गर्दीवरून स्पष्ट होते.

 गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी जय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. 

मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्पष्ट केले की, "राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा नक्कीच सुरू आहे, 

मात्र मी स्वतः सध्या कोणत्याही पदासाठी किंवा निवडणुकीसाठी इच्छुक नाही. मला लोकांमधे राहून थेट काम करायला अधिक आवडते."

 यावेळी बोलताना जय पवार यांनी आपल्या मनातील सर्वात मोठी इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले, "अजितदादांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले पाहण्याची महाराष्ट्रातील जनतेची आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून इच्छा होती. पण आता काळ पुढे गेला आहे. २०२९ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका होतील, तेव्हा सुनेत्रा वहिनींनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवावे, अशी माझी इच्छा आहे."

जय पवार यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याची भावना अनेकदा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. 

या जनता दरबाराच्या निमित्ताने जय पवार यांनी केवळ बारामतीवर आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले नाही,

 तर 'सुनेत्रा पवार' हे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणून विरोधकांनाही विचार करायला भाग पाडले आहे.