निकोला जुर्कोविक हा एक एआय सुरक्षा संशोधक आहे. तो अमेरिकेतील एमईटीआर नावाच्या नॉन प्रॉफिट संस्थेत काम करत होता, जी प्रगत एआय प्रणालींची जोखीम तपासते. सध्या तो नाइटिंगेल कलेक्टिव्ह या संस्थेशी जोडलेला आहे. त्याने 26 नोव्हेंबर 2026 रोजी एक्सवर आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी अ वॉर्निंग अबाऊट एआय टू माय लव्हड वन्स या नावाने एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रामुळेच तो सध्या जगभर चर्चेत आला आहे.
"आपण पुढचा थँक्सगिव्हिंग सण पाहू की नाही, याबद्दल मला पहिल्यांदाच शंका वाटत आहे." असे निकोलाने पत्राच्या सुरुवातीलाच लिहिले आहे. त्याच्या मते एआय प्रणालींनी या वर्षात अनेक मोठ्या कंपन्यांवर सायबर हल्ले केले आहेत. आतापर्यंत हे नुकसान फक्त पैशापुरते मर्यादित होते. पण पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये यातून मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
एआयमुळे धोका कसा निर्माण होऊ शकतो, याची तीन कारणे त्याने सांगितली आहेत.
1. एआय हाताबाहेर जाऊन एखाद्या देशाच्या महत्त्वाच्या यंत्रणा हॅक करू शकते. वीज, पाणी, बँकिंग, रुग्णालय अशा सेवा ठप्प होऊ शकतात.
2. एखादी वाईट प्रवृत्तीची व्यक्ती एआयच्या मदतीने जैविक शस्त्रे तयार करू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना धोका होऊ शकतो.
3. जगातील मोठे नेते आणि कंपन्या निर्णय घेण्याची सगळी सत्ता यंत्रांच्या हातात देऊ शकतात. त्यामुळे माणसाचे नियंत्रण संपुष्टात येऊ शकते.
2030 पर्यंत 50 टक्के धोका असल्याचा दावा
कठोर जागतिक नियम लावले नाहीत तर एआय स्वतःच स्वतःला सुधारू लागेल आणि 2027 पर्यंतच सर्वात हुशार माणसापेक्षाही खूप पुढे जाईल, असा अंदाज निकोलाने वर्तवला आहे. अशी अतिप्रगत एआय मानवी जगण्याच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, असे त्याचे म्हणणे आहे. जोपर्यंत एआयच्या विकासाला जाणीवपूर्वक ब्रेक लावला जात नाही, तोपर्यंत 2030 पर्यंत मानवजात नष्ट होण्याची किंवा तिची सत्ता जाण्याची शक्यता नाणेफेकीसारखी 50 टक्के आहे, असे त्याने लिहिले आहे.
तसेच 2027 च्या शेवटी सुट्टीचा सण साजरा करता येणार नाही, याची शक्यता 5 ते 20 टक्के आहे, असाही अंदाज त्याने व्यक्त केला आहे. हे आकडे त्याचे वैयक्तिक मत आहे, सर्व संशोधकांचे एकमत नाही, हेही त्याने स्पष्ट केले आहे.
नोकऱ्या आणि रोजच्या जीवनावर काय परिणाम होईल
निकोलाच्या मते मानवजात वाचली तरी पुढील 10 वर्षांत बहुतेक नोकऱ्या जाऊ शकतात. शिक्षण, करिअर, लग्न, कुटुंब नियोजन यांसारख्या पुढील 1 ते 5 वर्षांच्या योजना पूर्णपणे बिघडू शकतात. लहान मुले असलेल्या त्याच्या काही मित्रांना आपली मुले शाळेत जातील की नाही, याचीही चिंता वाटते, असे त्याने पत्रात नमूद केले आहे.
घरी काय तयारी ठेवावी,
निकोलाने व्यावहारिक सल्ला दिला आहे. किमान 15 दिवस पुरेल इतके अन्न आणि पाणी घरी साठवून ठेवावे. तसेच काही रोख रक्कम जवळ ठेवावी. कारण या धोक्यामुळे ऑनलाइन बँकिंग सेवा बंद पडू शकते. पुढील वर्षी येणारे संकट हे कोविड 19 महामारीपेक्षाही जास्त धोकादायक आणि त्रासदायक असू शकते, असे त्याचे म्हणणे आहे.