कल्याण : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 17 वर्षे जुना मानहानी खटला भोवणार आहे. या प्रकरणातील जबाब नोंदवण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात सुनावणी होणार आहे. हा खटला 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या एका घटनेवरून दाखल झाला आहे. तत्कालीन उमेदवार दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता.
22 एप्रिल 2009 रोजी डोंबिवलीत झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी एक व्हिडिओ दाखवला होता. त्यात वसंत डावखरे पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची पर्वा न करता निवडणूक जिंकण्याबाबत बोलत असल्याचे दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ एडिट केलेला आणि बनावट असल्याचा आरोप करत आपली प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत डावखरे यांनी मानहानीचा खटला दाखल केला. 14 सप्टेंबर 2009 रोजी त्याची अधिकृत नोंद झाली.
सध्या खटला कलम 313 च्या टप्प्यात आहे. यामध्ये आरोपींना न्यायालयासमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे लागते. ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी माहिती दिली की, उद्धव ठाकरे प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब देण्यासाठी अर्ज करणार आहेत. यासाठी विधी सल्लागार अनिल परब यांच्या सूचनेनुसार तयारी सुरू आहे. सुरक्षा आणि पोलीस बंदोबस्ताचा ताण टाळण्यासाठी व्हीआयपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मुभा असते. याच कारणामुळे सहआरोपी एकनाथ शिंदे यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी अर्ज केल्याचे समजते. तक्रारदार वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार हा खटला चालवत आहेत. सर्व आरोपींचे जबाब पूर्ण झाल्यानंतरच अंतिम युक्तिवाद आणि निकाल होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.