1 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा - टॉप न्यूज मराठी

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून सक्रिय होणार; काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा यलो अलर्ट

राज्यात यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले असून जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, आता जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 1 जुलैपासून अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2 जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तो काही दिवस अरबी समुद्रातच रेंगाळल्याने महाराष्ट्रात त्याचे आगमन उशिरा झाले. जून महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असली, तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात 29 आणि 30 जून तसेच 2 जुलै रोजी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 1 ते 5 जुलैदरम्यान जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण केली आहे. मात्र, पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाल्यास शेतीच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, देशातील काही राज्यांमध्ये, विशेषतः आसाममध्ये, मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#topnewsmarathi #topnews #breakingnews #monsoon