केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण : येरवडा तुरुंगात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला VIP ट्रीटमेंट? कुटुंबाचा गंभीर आरोप - टॉप न्यूज मराठी

पुणे: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना येरवडा तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. हा आरोप केतन अग्रवालचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र परिवाराने केला असून, संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखालील ‘गुलाबो गँग’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ या दोन सामाजिक संस्थांनी देखील तुरुंग प्रशासनावर हाच आरोप करत आंदोलन छेडले आहे. या आरोपांमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरण 

हे प्रकरण लोहगड किल्ला परिसरातील आहे, जिथे केतन अग्रवालची कड्यावरुन ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याची मैत्रीण सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड वाढवून मागितला होता, मात्र कोर्टाने तो अर्ज फेटाळला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सरकारने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यास मंजुरी दिली आहे. तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी पॉलीग्राफ अर्थात लाय-डिटेक्टर टेस्ट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टानेही पोलिसांचा टेस्टबाबतचा अर्ज फेटाळला. सध्या पुणे ग्रामीण पोलीस 4,400 हून अधिक कॉल डिटेल्स, डिजिटल फुटप्रिंट्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केस मजबूत करत आहेत.

VIP ट्रीटमेंटचा आरोप नेमका काय ? 

केतनच्या कुटुंबाचा आरोप आहे की, येरवडा महिला तुरुंगात सिया गोयलला नियमबाह्य जाऊन अनेक खास सुविधा दिल्या जात आहेत. तिला सर्वसामान्य कैद्यांपेक्षा वेगळी आणि VIP सारखी वागणूक मिळत आहे. हाच आरोप चेतन चौधरीच्या बाबतीतही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘गुलाबो गँग’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ यांनी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आणि आरोपी सिया गोयलच्या घरासमोर 2 दिवस आंदोलन केले. आंदोलकांची मागणी आहे की, तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सर्व अवैध सवलती ताबडतोब बंद कराव्यात. केतनच्या कुटुंबाने एका निवेदनात म्हटले आहे की, “ही लढाई फक्त आमच्या केतनसाठी नाही, तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक कायम राहावा यासाठी आम्ही लढत आहोत.” 

कुटुंबीयांनी येरवडा तुरुंगातील संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची आणि तुरुंगातील सुविधांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीला रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीसह अनेक स्थानिक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.