सावधान : RTO च्या नावाने बनावट लिंक पाठवून लूट, परिवहन विभागाचा इशारा, चुकूनही या लिंकवर क्लिक करू नका - टॉप न्यूज मराठी

पुणे : ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची नोंदणी किंवा ई-चलन भरण्याच्या नावाखाली सध्या मोठी फसवणूक सुरू आहे. परिवहन विभागाच्या नावाने बनावट वेबसाईट, खोटे APK अॅप्स आणि व्हॉट्सअॅपवर बनावट लिंक पाठवून लोकांचे पैसे लुटले जात आहेत.

फसवणूक कशी होते तर तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो, दंड त्वरित भरा नाहीतर लायसन्स सस्पेंड होईल. या मेसेजमध्ये एक लिंक असते. त्या लिंकवर क्लिक केले की तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाते. RTO Services.apk, Parivahan_Update.apk, eChalan Pay.apk अशी अॅप्स डाउनलोड करायला सांगितले जाते, ती अजिबात डाउनलोड करू नका.

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की RTO कडून कधीही व्हॉट्सअॅपवर पेमेंट लिंक पाठवली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी फक्त अधिकृत वेबसाईटच वापराव्यात. वाहन नोंदणीसाठी VAHAN, लायसन्ससाठी SARATHI, परिवहन सेवांसाठी Parivahan आणि दंड भरण्यासाठी NextGen eChallan या अधिकृत साईटवरच जा.

जर तुम्हाला असा संशयास्पद मेसेज आला तर ताबडतोब cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करा किंवा 1930 या सायबर हेल्पलाईनवर कॉल करा. जवळच्या सायबर पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवू शकता.