आजकाल सोशल मीडियावर किंवा मेसेजद्वारे "तुमचे बँकेचे कर्ज माफ करून मिळेल" अशा आशयाच्या अनेक जाहिराती फिरताना दिसत आहेत. पण थांबा! ही तुमच्या मदतीची नाही, तर तुम्हाला लुटण्याची जाणीवपूर्वक रचलेली चाल असू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अशा फसव्या जाहिरातींबाबत सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नेमका प्रकार काय आहे?
काही संस्था किंवा व्यक्ती बँका आणि NBFC कडील थकीत कर्ज माफ करण्याचे खोटे आश्वासन देतात. यासाठी ते:लोन वेव्हर सर्टिफिकेट' सारखी खोटी कागदपत्रे दाखवून लोकांचा विश्वास संपादन करतात. कर्ज माफ करून देण्याच्या बदल्यात 'सर्व्हिस चार्ज' किंवा 'लीगल फी' म्हणून आगाऊ पैशांची मागणी केली जाते.
तुम्ही जाळ्यात कसे अडकता?
१. ठग तुम्हाला विश्वास देतात की त्यांच्याकडे बँकेकडून कर्ज माफ करून घेण्याचा विशेष मार्ग आहे.
२. त्यांच्या सांगण्यावरून लोक त्यांना फी देतात आणि बँकेचे हप्ते भरणे बंद करतात.
३. परिणामी, बँक तुम्हाला 'डिफॉल्टर' घोषित करते, तुमची क्रेडिट हिस्ट्री (CIBIL) खराब होते आणि आर्थिक नुकसान होते ते वेगळेच!
कोणत्याही कर्जमाफीच्या स्कीमबद्दल माहिती हवी असल्यास तुमच्या बँकेच्या अधिकृत शाखेत किंवा वेबसाइटवर जाऊन खात्री करा.
कोणतीही अधिकृत बँक कर्जमाफीसाठी तिसऱ्या व्यक्तीमार्फत आधी फी मागत नाही.
जे स्वतःला बँक किंवा आरबीआयचे एजंट सांगतात, त्यांची ओळख पटल्याशिवाय व्यवहार करू नका.
आपली वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका.
आरबीआय काय म्हणते?
अशा दिशाभूल करणाऱ्या संस्थांमुळे बँकांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो आणि प्रामाणिक ठेवीदारांचेही नुकसान होते. अशा फसव्या लोकांपासून दूर राहा आणि असा प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस किंवा सायबर सेलकडे तक्रार करा.
लक्षात ठेवा: कष्टाचे पैसे आणि तुमची क्रेडिट प्रतिष्ठा वाचवण्यासाठी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा!