मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके ठेवलेल्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल साडेपाच वर्षांनंतर त्यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता, मात्र NIA ने या जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यावर आज न्यायालयात सुनावणी होणार असल्याने वाझे यांची सुटका होणार की पुन्हा तुरुंगातच राहावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयात नेमके काय घडले
विशेष सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा जामीन अर्ज अटीशर्तींसह मंजूर केला. कोर्टाने स्पष्ट केले की जामीन मिळणे म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, पुराव्यांची अंतिम तपासणी पुढे होणार आहे. जामीन देताना कोर्टाने 1 लाख रुपयांचा वैयक्तिक बॉन्ड आणि एका स्थानिक जामीनदाराची अट ठेवली आहे. तसेच पासपोर्ट असेल तर तो NIA कडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सगळ्यात महत्वाची अट म्हणजे सचिन वाझे यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्यास आणि राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त कोर्टाच्या सुनावणीसाठीच त्यांना या जिल्ह्यांमध्ये येता येईल. जामीन आदेशानंतर सात दिवसांच्या आत त्यांना मुंबईबाहेरील राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता द्यावा लागणार आहे आणि त्यांनी पुण्यात राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जामीन मिळाल्यास त्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणात UAPA अंतर्गत दहशतवादी कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. दरम्यान, NIA ने या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात याचिका दाखल केली असून स्थगितीवर आज सुनावणी होईल.
कोण आहेत सचिन वाझे
सचिन वाझे हे मुंबई पोलिस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात होते. 1990 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या वाझे यांनी अंडरवर्ल्ड विरोधातील अनेक कारवायांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नावावर 60 हून अधिक एन्काऊंटरची नोंद आहे. 2004 मध्ये ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिवसेनेत गेले होते. 2020 मध्ये पुन्हा त्यांना पोलीस दलात घेण्यात आले आणि त्यांची नियुक्ती मुंबई क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये करण्यात आली होती. अँटिलिया प्रकरणानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
अँटिलिया बाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण काय आहे. हे प्रकरण 2021 मधील सर्वात गाजलेले प्रकरण होते.
1. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळली होती.
2. या गाडीत 20 जिलेटिनच्या कांड्या आणि मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नीला धमकी देणारे एक पत्र सापडले होते.
3. या गाडीचे मालक मनसुख हिरेन हे होते. काही दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता, त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
4. तपासादरम्यान या कटात सचिन वाझे यांचाच हात असल्याचा आरोप NIA ने केला. वाझे यांनीच ही गाडी तिथे ठेवल्याचा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
5. या प्रकरणात NIA ने सचिन वाझे यांना 13 मार्च 2021 रोजी अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.