नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ड्रग्ज तस्करीचे सर्वात मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे. भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएस आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करत इराणी बोटीतून 526 किलो हाय ग्रेड हेरॉईन आणि मेथअँफेटामाईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या बोटीवर असलेले 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई 25 सप्टेंबरच्या संध्याकाळी लक्षद्वीपच्या वायव्येस 160 नॉटिकल मैल आणि मुंबईपासून 490 नॉटिकल मैल अंतरावर करण्यात आली. बोटीचे नाव आझाद असे आहे. ही बोट इराणी असून तिच्यावर 5 पाकिस्तानी क्रू मेंबर होते. त्यांची नावे मोहम्मद याकूब बलोची, शाकीरउल्लाह, फरीदउल्लाह, अहमद खान आणि वाहीदउल्लाह खान अशी असून ते सर्व पेशावरचे रहिवासी आहेत.
गुजरात एटीएसला गुप्त माहिती मिळाली होती की एका नायजेरियन नागरिकाने गुजरातमधील वॉन्टेड आरोपीला भेटून इराणमधून 500 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज भारतात आणण्याचा प्लॅन केला आहे. यासाठी हवाला मार्फत पैसे देखील पाठवण्यात आले होते. या माहितीच्या आधारे कोस्ट गार्डने समुद्र आणि हवाई पाळत ठेवली आणि संशयित बोटीचा पाठलाग करून तिला पकडले.
प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की ही बोट लक्षद्वीप आणि मुंबईच्या जवळून जाऊन मध्य समुद्रात तामिळनाडूच्या बोटीवर हा माल उतरवणार होती. तिथून हा माल तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आणला जाणार होता. हा माल भारतातच विकायचा होता की दुसऱ्या देशात पाठवायचा होता याचा तपास सुरू आहे.
जप्त केलेली बोट आणि 5 आरोपींना सशस्त्र सुरक्षा रक्षकांसह मुंबई बंदरात आणण्यात आले आहे. आता गुजरात एटीएस, कोस्ट गार्ड, एनसीबी आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा त्यांची संयुक्त चौकशी करणार आहेत. या मागे कोणते मोठे सिंडिकेट आहे, पैसा कुठून आला आणि मालाचा खरा मालक कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.
तटरक्षक दलाने सांगितले की या कारवाईमुळे शत्रू देशांच्या ड्रग्ज सिंडिकेटचे आर्थिक कंबरडे मोडले आहे आणि नशा मुक्त भारत अभियानाला मोठे यश मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरबी समुद्रातून होणारी ड्रग्ज तस्करी वाढली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.