तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. MPSC ने गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा सविस्तर अभ्यासक्रम जाहीर केला आहे. या भरतीत तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी पदाच्या 1539 जागांसह एकूण 5707 जागा भरल्या जाणार आहेत.
पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी असतील. परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने होईल आणि वेळ फक्त 1 तास मिळेल. परीक्षेचा दर्जा पदवी स्तरावरील असेल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुण असणार आहेत. एक उत्तर चुकले तर त्या प्रश्नाच्या 25 टक्के गुण वजा होतील. दोन पर्याय निवडले किंवा वर्तुळ अर्धवट भरले तरी उत्तर चुकीचे धरले जाईल. प्रश्न सोडला तर मात्र गुण वजा होणार नाहीत.
पूर्व परीक्षेत पास झालेल्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. त्यात दोन पेपर असतील. फक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी 300 गुणांची वेगळी मुख्य परीक्षा होईल.
पूर्व परीक्षेत 8 विषय असतील. इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. यात महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था आणि चालू घडामोडी यावर जास्त भर द्यावा लागणार आहे.